पुणे - राज्यात वाढत असलेल्या कोरोनामुळे राज्य सरकारकडून अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमासह सर्वच कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लावणीचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बंद करण्यात आला. संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
संबंधितांवर कारवाई करावी - मनसे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराचे सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष शशिकांत कोठावडे यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुणे शहरात कोरोना झपाट्याने रुग्ण वाढ होत असल्याने सर्व राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय पुण्यात घेण्यात आला होता. उपमुख्यमंत्री आणि पालक मंत्री अजित पवार यांनी हा निर्णय जाहीर केला होता. असे असताना राजरोसपणे बालगंधर्व रंगमंदिरात लावणीचा कार्यक्रम रंगला होता. एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाची कुणकुण लागल्यावर मनसे नेते तिथे पोहोचले आणि त्यानी हा कार्यक्रम बंद पाडला. " कोरोना वाढत असताना असा कार्यक्रम घेतला जातोय. राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा वाढदिवस इथे साजरा झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आदेश त्यांनी धुडकावला आहे" असा आरोप करत कारवाईची मागणी मनसेचे कसबा अध्यक्ष गणेश भोकरेंनी केली आहे.
अनेक लोकांचो कार्यक्रमाला हजेरी -
पुणे शहरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सर्व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. राजकारण्यांनी कोणताही कार्यक्रम घेवु नये तसेच त्याला हजेरी लावु नये असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. असे असताना बालगंधर्व रंगमंदिरात थेट तमाशा रंगला होता. रंगमंदिरात कमी लोकांची उपस्थिती असली तरी देखील अनेक लोक या कार्यक्रमाला हजर होते.