पुणे - राज्यातील जवळपास १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांची आजपासून दहावीची बोर्डाची लेखी परीक्षा ( Maharashtra ssc exam 2022 ) सुरू होत आहे. राज्यातील तब्बल २१ हजार ३८४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
हेही वाचा - Praveen Chauhan Resign : निःपक्षपाती तपास व्हावा म्हणून मी राजीनामा दिला, प्रवीण चव्हाण यांची माहिती
राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील २२ हजार ९११ माध्यमिक शाळांमधून १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये आठ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी आणि सात लाख ४९ हजार ४७८ विद्यार्थिनी आहेत. परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात पाच हजार ५० मुख्य केंद्र आणि १६ हजार ३३४ उपकेंद्र मिळून तब्बल २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाल्याने परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे, कोणतीही भीती न बाळगता, मानसिक दडपण न घेता विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षा द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.
परीक्षेसाठी केलेल्या उपाययोजना :
- नेहमीपेक्षा १५ दिवस उशिराने परीक्षेचे आयोजन
- ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा
- नियोजित वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर मिळणार प्रश्नपत्रिका
- ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे जादा वेळ
- ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे अधिक वेळ
- एका वर्गासाठी २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सिलबंद पाकिट असेल
हेही वाचा - Maharashtra Kesari Wrestling Competition : महाराष्ट्र केसरी स्पर्धेला यंदा अभिजित कटके मुकणार