पुणे - प्रवाशांच्या सोयीसाठी टप्प्याटप्प्याने पीएमपीमएलच्या सुविधांचे 'डिजिटलायझेशन' करण्यावर येत्या काळात भर दिला जाणार आहे. यामध्ये तिकिटाऐवजी स्मार्टकार्ड, बसच्या लाईव्ह माहितीसाठी जीपीएस ट्रॅकिंग यासह अन्य काही सुविधा आणि तक्रारींच्या नोंदीसाठी स्वतंत्र ऍप विकसित करण्याचा आमचा मानस असून, आगामी काळात ई-सुविधांचा अधिक विकास करण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे (पीएमपीएमएल) नवनियुक्त अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.
'डिजिटल जाहिरातींवर जास्त भर देणार'
पुणे शहरात ज्या ज्या ठिकाणी पीएमपीएमएलचे डेपो आहे. त्याठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या कशा पद्धतीने फायदा होईल, याचा विचार करण्यात येत आहे. त्याचबरोबर डिजिटल जाहिरातवरही भर देण्यात येणार असून त्याचाही वापर करण्यात येणार आहे. पीएमपीएमएलला जास्तीत जास्त फायदा कशा पद्धतीने होईल, यावर येणाऱ्या काळात भर देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांशी संवाद साधण्यासाठी किंवा त्यांना तक्रारीसाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार आहे, असेही यावेळी मिश्रा यांनी सांगितले.
'अॅप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक सेवा देणार'
पीएमपीएमएलच्या सेवा डिजीटल करण्यासाठी येत्या काळात पावले उचलण्यात येणार आहेत. अॅप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येतील. प्रवाशांना आपल्या मार्गावरील बसचे लाईव्ह लोकेशन समजले पाहिजे. तसेच, बसमध्ये आल्यानंतर गुगल पे, क्यू.आर.कोड स्कॅन करून तिकीट काढण्याची सोय मोबाइल फोनद्वारे कशी उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असही यावेळी मिश्रा यांनी सांगितले.
'पीएमआरडीए'ने संचलन तूट द्यावी'
पुणे आणि पिपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात पुरविण्यात येणाऱ्या बससेवेचा विस्तार आता पीएमआरडीए हद्दीपर्यंत करण्यात आला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत याला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार महामंडळाने पीएमआरडीएच्या हद्दीत अनेक मार्ग देखील सुरू केलेले आहेत. दरम्यान, पीएमपीएलला ज्याप्रमाणे दोन्ही महापालिकांकडून संचलन तूट देण्यात येते. त्याचप्रमाणे पीएमआरडीए प्रशासनाने देखील संचलन तूट द्यावी, अशी मागणीही यावेळी मिश्रा यांनी केली.
‘पीएमपीएमएल’मध्ये १४ वर्षांत १६ अध्यक्ष
शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्र, तब्बल २ हजार बस आहे. १० हजार कर्मचारी असलेली संस्था आहे. परंतु गेल्या १४ वर्षांत तब्बल १६ अध्यक्ष पीएमपीने अनुभवले आहे. एखादा अपवाद वगळता पीएमपीमध्ये एकही अधिकारी कार्यकाळ पूर्ण करू शकलेला नाही.