पुणे : पुणे येथे भारतातील पहिली लहान मुलांची वाहतूक पाठशाला सुरू करण्यात आली आहे. पुणे शहराला जसे सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते, तसे याच पुणे शहराला वाहतुकीच शहरदेखील म्हटलं जातं. गेल्या काही वर्षांत सगळीकडे वाहतूककोंडी होताना दिसून येत आहे. अशातच येणाऱ्या भावी पिढीला वाहतुकीचे नियम लागावे आणि त्यांना रस्त्यावर चालताना कोणकोणत्या नियमावलीच पालन करावं यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून भारतातील पाहिलं मुलांची वाहतूक पाठशाला उद्यान सुरू करण्यात आले आहे.
लहान मुलांची वाहतूक पाठशाला : भारतात मुलांचे वय १८ झाल्यावर वाहन चालविणेसाठीचा परवाना मिळताना मुलांना वाहतूक नियम व त्याबाबत माहिती दिली जाते. शालेय जीवनामध्येही याबाबतची अद्याप माहिती दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांना प्राणास मुकणे व अपंगत्व येणेच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत. या बाबींचा विचार करून पुणे शहरामध्ये अर्बन ९५ या संकल्पनेवर आधारित वाहतूक विषयक प्रकल्प उभारणेचा विचार करण्यात आला. त्याअनुषंगाने ब्रेमन चौक, औंध या ठिकाणी सिंध सोसायटी येथील सुमारे एक एकर जागेत हे उद्यान बांधण्यात आले आहे. अर्बन 95 म्हणजेच 95 सेंटीमीटरच्या मुलांना शहरातील वाहतूक व्यवस्था कशी आहे आणि त्याचे नियम काय हे सांगण्यासाठी हे उद्यान सुरू करण्यात आले आहे.
अशी आहे पाठशाला : या उद्यानात 12 वर्षांखालील मुलांना एंट्री असून या ठिकाणी सुमारे ४मी. रुंदीचा व १६० मी. लांबीच्या रस्त्याची प्रतिकृती तयार केली गेली आहे. त्यामध्ये रस्त्यावरील दुहेरी मार्गिका, सायकल मार्ग, पार्किंग व्यवस्था, तीन व चार रस्ते मिळणारे चौक, रस्ते मार्किंग, सिग्नल यंत्रणा, स्वतंत्र सिग्नल यंत्रणेसह सुरक्षित पादचारी क्रोसिंग, वाहतूक विषयक चिन्हांचे फलक रस्त्यांचे विशिष्ट ठिकाणी बसविणेत आले आहेत. तसेच शहरी भागात वापरण्यात येणारी सुरक्षेसंबंधित / माहितीचे चिन्हांची उमट रेखीव पद्धतीने लहान मुलांचे खेळाच्या स्वरूपात मांडणी करण्यात आली आहे. तसेच त्या सर्व चिन्हांची मराठी व इंग्रजी भाषेमध्ये फलकवार अर्थासह माहिती देण्यातदेखील आली आहे. वाहनावर वापरण्यात असलेल्या विविध रंगांच्या व विविध वापरासाठी येणाऱ्या नंबर प्लेटची माहितीदेखील या उद्यानात देण्यात आली आहे. त्यामुळे मुलांना खेळत खेळत वाहतूकविषयक चिन्हांची माहिती मिळणार असल्याची माहिती यावेळी महापालिकेचे अधिकारी मकरंद वाडेकर यांनी दिली आहे.
सेफ किड्सचा पुढाकार: पुणे महापालिका आणि सेफ किड्स यांच्या 5 वर्षांचा करार झाला असून, सेफ किड्स फाउंडेशनच्या वतीने या उद्यानात येणाऱ्या मुलांना वाहतुकीच्या नियमाबाबत माहिती दिली जाते. कोणकोणते नियम पाळले गेले पाहिजे. कोणत्या चिन्हाचा काय अर्थ असतो. तसेच रस्त्यावर सायकल चालवताना सायकल ट्रॅकचा वापर कसा करावा. चौकात उभे असताना कोणत्या सिग्नलचा काय अर्थ होतो याबाबत संपूर्ण माहिती सेफ किड्सच्या माध्यमातून दिली जाते. असे यावेळी सेफ किड्सच्या कल्याणी पवार यांनी सांगितले.
आतापर्यंत 50 हून अधिक मुलांनी दिली भेट : या उद्यानाचे एक वर्षाअधीच लोकार्पण करण्यात आले होते. पण, मध्यंतरीच्या काळात कोरोना कालावधीत निर्बंधामुळे प्रत्यक्ष लहान मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आले नाही. आता कोरोना निर्बंध हटविल्यामुळे मुलांची वाहतूक पाठशाळा प्रकल्प प्रत्यक्ष मुलांसाठी 31 मे पासून सुरू करण्यात आले आहे. हे उद्यान सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत खुला असतो.आत्ता पर्यंत 50 हुन अधिक मुलांनी या ठिकाणी भेट दिली असून या मुलांमध्ये वाहतुकीच्या नियमावलीबाबत जनजागृती करण्यात आली आहे.
हेही वाचा : Pune Traffic Police : देवदूत! ट्राफिक पोलिसांनी सांगितला अपघातानंतरच्या गोल्डन आवर्समधील थरारक अनुभव