पुणे- जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. मात्र येत्या तीन-चार दिवसात राज्यात पुन्हा चांगल्या पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
राज्यात सध्या कोकण, गोवा परिसरामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडतो आहे. मात्र, राज्याच्या उर्वरित भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. 18 जुलैपासून हळूहळू पाऊस पुन्हा जोर धरणार असून 20 आणि 21 जुलैला राज्यात सर्वदूर पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात दक्षिण मध्य महाराष्ट्र पासून कर्नाटक पर्यंत प्रभात तयार झाले असून ते आणखीन मजबूत होत आहेत. तसेच बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या अनेक भागात 19 तारखेनंतर चांगल्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा सर्व ठिकाणी हा पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून मराठावाडा परिसरात 20 ते 21 जुलै या काळात काही ठिकाणी जोरदार पावसाचा आणि सर्वदूर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातही येत्या चार दिवसात पावसाचा जोर वाढून 20 ते 21 तारखेनंतर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.