पुणे - पोलिसांनी एका अशा तरुणाला अटक केली, ज्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवत एक दोन नव्हे तर तब्बल 53 तरुणींची फसवणूक केली होती. यातील चार मुलींसोबत तर त्याने लग्न करून खोटा संसारदेखील मांडला होता. ह्याच तरुणींच्या नातेवाईकांना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांचा गंडादेखील घातला होता. योगेश दत्तू गायकवाड (रा. कन्नड, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विश्वास संपादन केला
काही दिवसांपूर्वी फिर्यादी तरुणी ही आईच्या उपचारासाठी बिबवेवाडी परिसरातील एका रुग्णालयात आली होती. आईची भेट घेऊन परत जाण्यासाठी ती एका बस स्टॉपवर थांबली होती. यावेळी आधार कार्ड पडल्याचे नाटक करून आरोपीने तिच्यासोबत ओळख वाढवली. तिचा मोबाइल नंबर घेत तिच्याशी संपर्क सुरू ठेवला. त्यानंतर आपण सैन्यदलात नोकरीला असल्याचे सांगून फिर्यादी आणि फिर्यादीच्या आईचा विश्वास संपादन केला. फिर्यादीचा विश्वास बसावा, यासाठी आरोपीने बनावट ओळखपत्रदेखील दाखवले होते.
प्रत्येकाकडून घेतले दोन लाख
आरोपी योगेश याने फिर्यादी तरुणीसोबत प्रेमाचे खोटे नाटक केले. तिच्यासोबत विवाहदेखील केला. यानंतर आरोपीने फिर्यादीच्या भावाला आणि तिच्या गावातील काही तरुणांना सैन्यदलात आणि रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्याने प्रत्येकाकडून दोन लाख अशाप्रकारे 50 ते 60 लाख रुपये घेतले. पैसे दिल्यानंतरही नोकरी लागत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
सोशल मीडियाद्वारेही फसवणूक
आरोपी योगेशने आतापर्यंत 50हून अधिक तरुणींची अशाप्रकारे फसवणूक केल्याचे उघड झाले. पुण्यात विविध ठिकाणी फिरताना तो एकट्यादुकट्या तरुणींना गाठून त्यांच्याशी ओळख वाढवायचा आणि प्रेमाचे नाटक करून त्यांची फसवणूक करायचा. त्यासोबतच सोशल मीडियाद्वारेदेखील त्याने काही मुलींची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.