पुणे - देशाच्या फाळणीमध्ये सिंधी समाजाने आपले सर्वस्व गमावले. परंतु खचून न जाता स्वत:च्या कर्तबगारीवर त्यांनी व्यापारात जम बसवला. पिंपरी-चिंचवडच्या प्रगतीमध्ये सिंधी समाजाचे मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज काढले. त्यांच्या हस्ते पुण्यात सिंधी बांधवांना नागरिकत्व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
सिंधी बांधवांना नागरिकत्व प्रमाणपत्रांचे वाटप
भारतीय नागरिकत्व अधिनियम 1955 अन्वये सर्कीट हाऊस, पुणे येथे सिंधी बांधवांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नागरिकत्व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार आण्णा बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक हिरानंद आसवानी उपस्थित होते.
136 सिंधी नागरिकांना नागरिकत्व प्रदान करण्यात आले
उद्योगनगरी म्हणून पिंपरी-चिंचवडची राज्यभर ओळख आहे. पिंपरी-चिंचवडच्या आर्थिक उलाढालीमध्ये सिंधी समाजाचा मोठा वाटा आहे. अतिशय विनम्रपणे हा समाज राहतो. शहरातील नागरिकांना, मूळ रहिवाशांना त्यांचा कधीच त्रास होत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. नागरिकत्वासाठी सिंधी बांधवांचे 215 प्रस्ताव प्राप्त होते, त्यापैकी आज अखेर 136 जणांना नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रलंबित प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने पाठपुरावा करण्याच्या सूचनाही यावेळी अजित पवार यांनी दिल्या.