पुणे - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) 14 जून रोजी श्री क्षेत्र देहू येथे येणार असून त्यांच्या हस्ते जगद्गुरू तुकाराम महाराज ( Tukaram Maharaj ) शिळा मंदिराचे लोकार्पण ( Dedication Of The Temple ) होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या देहू नगरीत सुरू आहे. या कामाचा आढावा आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील ( Chandrakant Patil ) यांनी घेतला. चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिरात जाऊन महाराजांचे दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
कार्यक्रमाची जय्यत तयारी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने वारकरी बांधव येणार आहेत. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यावेळी केले. यावेळी प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई खापरे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या दौऱ्याची प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंदिर ट्रस्ट तर्फे विशेष डिझाइनची पगडी घालण्यात येणार आहे. याकरिता पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले ( Murudkar Zendewale in pune ) यांना देहू संस्थांन विश्वस्तांनी तुकाराम पगडी आणि उपरणे तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. आणि मुरुडकर यांच्याकडून विशेष अशी तुकाराम पगडी तयार करण्यात आली आहे.
20 जूनपासून पालखी सोहळा - येत्या 20 जूनपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा सोहळा मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडत होता. यंदाच्या या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे वारकऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे. तसेच, सोहळ्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूला भेट देणार असल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिळा मंदिर आणि संत तुकोबांच्या मूर्तीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहेत. त्या अगोदर देहू जवळील परिसरात मोठा मंडप टाकण्यात आला आहे. तिथून नरेंद्र मोदी हे वारकरी संप्रदायाला संबोधित करणार आहेत. ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून देहूत पूर्व तयारीची लगबग सुरू झाली आहे.