पुणे - कस्टम विभागातील अधिकाऱ्यांनी पुणे विमानतळावरून 151.82 ग्रॅम सोने जप्त केले आहे. जप्त केलेले हे सोने 24 कॅरेट असून त्यांची किंमत 7 लाख 89 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. 29 ऑक्टोबरला दुबईहून पुणे येथे आलेल्या एका प्रवाशाकडून कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर हे सोने जप्त केले आहे.
प्रवाशाने हे सोने मोठ्या खोड रबरामध्ये लपवून ट्रॉली बॅगच्या हँडलमध्ये लपविले होते. तसेच आणखी एक खोड रबर चॉकलेट बारमध्ये लपवण्यात आले होते. कस्टम विभागाने या सर्व वस्तू जप्त केल्या आणि त्यांची तपासणी केली असता ही तस्करी उघडकीस आली. कस्टम विभागाने हे सर्व सोने जप्त केले असून पुढील कारवाई केली जात आहे.