पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नेहेमी कोरोनाच्या नियमाबाबत कडक अंमलबजावणी वेळोवेळी पाहायला मिळते. नाहीतर अजित पवार आपल्याच शैलीत समोरच्या व्यक्तीला उत्तर देताना अनेक उदाहरणे आपण पहिलेच आहे. मात्र, आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसली.
दादांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांनीच तुडवले पायदळी -
उपमुख्यमंत्री अजित पवार नेहेमी गर्दी टाळण्याचे आवाहन करत असतात. आज झालेल्या बैठकीत ही अजित पवार यांनी लोकांकडून पर्यटनस्थळे बाजारपेठा व अन्य ठिकाणी गर्दी होत असल्याने संताप व्यक्त केला होता. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
विकेंड लॉकडाऊन असतानाही कार्यक्रमाला गर्दी -
पुणे शहरात आजपासून विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार विनाकारण बाहेर फिरू नका, गर्दी करू नका, असे आवाहन वेळोवेळी अजित पवार करत असतात. विकेंड लॉकडाऊन असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमाला गर्दी पाहायला मिळाली.