पुणे - ओबीसीच्या आरक्षणासाठी (OBC Reservation) पुण्यात काँग्रेसच्यावतीने आज मोर्चा (Pune Congress Morcha) काढण्यात येणार होता. हे आंदोलन पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे सुरू होते. याचवेळी ओबीसी जनमोर्चाचे कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी काँग्रेसचे नेते व मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि मृणाल ढोले पाटील यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. ढोले पाटील यांनी काळा झेंडा दाखवून निषेध व्यक्त केला, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्यावतीने ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे महामोर्चा काढण्यात येणार होता. यावेळी काँग्रेसचे सर्व नेते व कार्यकर्ते जमले होते. याचवेळी ओबीसी जनमोर्चाचे मृणाल ढोले पाटील या कार्यकर्त्याने शांततेत चाललेल्या या आंदोलनात काळे झेंडे दाखवले आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
तो भाजपचा नव्हे तर ओबीसी जनमोर्चाचा कार्यकर्ता
मी गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी जनमोर्चाचे काम करत आहे. ओबीसी राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. माझ्या घरचे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असून मी कुठल्याही पक्षाशी संलग्न नसल्याचे मृणाल ढोले पाटील यांनी सांगितलं आहे.
जशास तसे उत्तर देऊ
आमच्या नेत्यांमध्ये आमच्याच मित्र पक्षाच्या एका कार्यकर्त्याने मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आमच्यात फूट पाडण्याचे काम केलं आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय असून आम्ही त्याचा निषेध करतो. अशा पद्धतीचे जर कोणी कृत्य करत असेल आणि तो जर आमच्याच मित्र पक्षाचा असेल तरी आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा देखील यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिला आहे.