पुणे - राज्यातील झिका व्हायरसचा पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याच्या बेलसर गावात सापडला. त्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला असून झिका व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. झिकावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
खबरदारीचा एक भाग म्हणून ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना कंडोमचे वाटप करण्यात आले आहे. पुरुषांच्या विर्यात झिका विषाणू आढळत असल्याने खबरदारी म्हणून कंडोमचे वाटप करण्यात आले आहे. याबरोबर आरोग्य विभागाकडून पुढील किमान चार महिने गावातील महिलांनी गर्भधारणा टाळली पाहिजे. तसेच 4 महिने लैंगिक संबंध टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. याचबरोबर सुरक्षित पद्धतीने शरीरसंबंध ठेवावेत, असेही वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पुरूषांच्या विर्यात आढळतो झिका विषाणू -
पुरंदर तालुक्यातील बेलसर हे साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून तापाचे काही रुग्ण आढळून येत होते. 16 जुलै रोजी त्यातील पाच रुग्णांची नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे तपासणीसाठी पाठवले होते. यातील तीन जणांना चिकनगुनिया झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या डॉक्टर योगेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने बेलसर आणि परिंचे या गावात भेट देऊन 41 संशयित रुग्णांचे नमुने घेतले होते. त्यातीलच एका 50 वर्षाच्या महिलेला झिका आजाराची बाधा झाली असल्याचे 30 जुलै रोजी निष्पन्न झाले. हा महाराष्ट्रातील झिका व्हायरसचा आढळलेला पहिला रुग्ण आहे.
हेही वाचा - मुंबईत डेल्टाप्लस रुग्णाचा मृत्यू; दोनदा लस घेतल्यानंतरही अंत