पुणे - पुण्यातील शिवणे येथे महिलेने एका तरुणाला मारहाण केल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी दुपारी ही शिवणे येथील दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे असलेल्या साई श्रद्धा रेसिडन्सीमध्ये ही घटना घडली होती. आज सकाळी त्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
काय आहे प्रकरण?
शिवणे येथील दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे असलेल्या साई श्रद्धा रेसिडन्सीमधील वंदना विजय पायगुडे या राहतात. त्यांनी मुलीला त्रास देतो म्हणून कोथरूड येथील प्रद्युम्न प्रकाश कांबळे (वय 22 वर्ष) या युवकाला घरात कोंडून दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते.
युवकाला केली गंभीर मारहाण -
बुधवारी दुपारी घरी मुलीला भेटायला आलेल्या प्रद्युम्नला मुलीच्या आईने घरात का आला. यावरून जाब विचारला असता झालेल्या वादावादीमध्ये वंदना पायगुडे यांनी प्रद्युम्न याला घरात कोंडून दांडक्याने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर तो तरुण तेथून निसटून पळाला असता त्याचा पाठलाग करून दांगट पाटील नगर येथील रस्त्यावर त्याला दोन युवकांच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता युवकाला मारहाण करून रिक्षामधून दोन जण पळून गेले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
सकाळी तरुणाचा दुर्दैवाने मृत्यू -
प्रद्युम्न कांबळे याला वारजे माळवाडी येथील माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरु होता. मात्र, आज सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेला आणि तिचा मुलगा आणि त्याच्या मित्राला वारजे पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा - Gutkha Mafia Raid : परभणीत मध्यरात्री गुटखा माफियांवर छापा ; 9 लाखांच्या गुटख्यासह 19 लाखाचा मुद्देमाल जप्त