पुणे - लोकप्रतिनिधींची सुरक्षा काढून राज्य सरकारने जनतेच्या आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. महाविकास आघाडी सरकारने माझी आणि काही लोकप्रतिनिधींची सुरक्षा हटवली आहे, त्यासाठी सरकारचे आभार व्यक्त करतो.
'लोकप्रतिनिधीला सुरक्षेची गरज नाही'
राज्यात कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस बिगडत चालली आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघे राज्य सरकारला विनंती करतो, की जोपर्यंत राज्यातील कायदा व सुव्यवस्था ठीक होत नाही, महिलांना पुरेसे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही, असे ते म्हणाले. पुढे सांगताना ते म्हणाले, की आम्हा सर्वांच्या सुरक्षा ताफ्यातून ज्या पोलीस जवानांना वगळण्यात आले आहे त्यांना महिला सुरक्षेचा विशेष कार्यभार देऊन गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षेची खरी गरज लोकप्रतिनिधींना नसून जनतेला आणि महिलांनाच आहे. पक्षाचे कार्यकर्ते हेच आमचे सुरक्षा कवच आहेत. त्यामुळे आमची काळजी न करता राज्यातील सुव्यवस्था नीट रहावी, याकडे राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे.
'पोलिसांची ऊर्जा इतर ठिकाणी वापरावी'
पत्रकार आणि राज्य सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबल्यामुळे न्यायालयाकडून सतत सरकारचे वाभाडे निघत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलिसांची ऊर्जा वाया न घालवता ती इतर ठिकाणी वापरण्यात यावी, अशी अपेक्षा करतो.