पुणे - घोड्यांच्या शर्यतीवर बेकायदेशीर बेटिंग घेणाऱ्या 31 जणांना पुणे पोलिसांनी एका विशेष कारवाईदरम्यान अटक केलीय. शहरातील हडपसर, कोंढवा, वानवडी परिसरात पोलिसांनी एकाचवेळी केलेल्या कारवाईत बेकायदेशीर बेटिंग करणारे मोठे बुकी पोलिसांच्या जाळ्यात सापडले. पोलिसांनी याप्रकरणी सहा गुन्हे दाखल केलेत. लॅपटॉप, मोबाईल, रोख रक्कम असा तीन लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
एकाचवेळी छापेमारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेसकोर्स परिसरात होणाऱ्या घोड्यांच्या शर्यतीवर बेटिंग सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वेगवेगळी पथके स्थापन करून एकाचवेळी शुक्रवारी रात्री वानवडी, कोंढवा, हडपसर परिसरातील बुकींच्या घरावर छापे मारण्यात आले. त्यामध्ये मुद्देमालासह गुन्हेगारांना अटक करण्यात आली.
एकूण ६ गुन्हे दाखल
याप्रकरणी पोलिसांनी वानवडी, कोंढवा, हडपसर या पोलीस स्टेशनमध्ये 6 गुन्हे दाखल केले असून 31 जणांना अटक केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 31 मोबाईल, सहा लॅपटॉप, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण तीन लाख 41 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.