पुणे - महत्वाकांक्षी व हौशी माणूस कधीही पूर्णपणे समाधानी होत नाही. माझ्या वयाच्या ९९ वर्षात परमेश्वराने मला खूप काही मिळविण्याची ताकद दिली. त्याप्रमाणे मी प्रयत्नही करत गेलो. छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा मोठा विषय आहे. त्यामुळे त्याविषयी अभ्यास, वाचन, लेखनकरुन स्वत: काहीतरी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. परंतु अजूनही खूप काही समजून घ्यायचे आहे, त्यामुळे वयाच्या ९९ वर्षांमध्ये मी आनंदी आहे, पण समाधानी व तृप्त नाही. मला भारतातच पुर्नजन्म मिळावा आणि अपुरे सर्व काही पूर्ण व्हावे, अशी भावना पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी तारखेप्रमाणे बाबासाहेब पुरंदरे यांचा ९९ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व इतिहास प्रेमी मंडळातर्फे पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'प्रारंभ शतकपूर्तीचा' हा भव्य रंगावली प्रदर्शनाचे आयोजन सदाशिव पेठेतील पेरुगेट भावे स्कूल प्रशाळेमध्ये करण्यात आले आहे. यावेळी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतली यावेळी ते बोलत होते.
मुलाखतीत अनेक गोष्टी उलगडले
शिवाजी महाराज हे समजावून घेण्याचा विषय आहे. १२ व्या वर्षात स्वराज्याचा विचार शिवाजी महाराजांनी केले होते. आजचे तरुण हे विचार करत नाही. ते त्यांनी करायला हवे, असेही यावेळी पुरंदरे यांनी सांगितले. त्याच बरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समोर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्याच समोर केलेल्या नकलीचा किस्सा या मुलाखतीत उलगडून दाखवल.