बारामती (पुणे) : बारामती शहरातील बुरुडगल्ली नजीक परिसरात एका सोळा वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्यास विहिरीत टाकून दिल्याची धक्कादायक घटना घडली. सदर प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैफ सलीम कुरेशी (१६) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
कैफ याच्या मानेवर, गालावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यानंतर त्याला मुंजोबा जवळील विहिरीत टाकून दिले होते. स्थानिक नागरिकांनी त्याला वेळीच विहिरीबाहेर काढत रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे त्याचे प्राण वाचले. याप्रकरणी कैफचे वडील सलीम मुनिर कुरेशी यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी एकास अटक केली आहे.
हेही वाचा... जगभरात कोरोना विषाणूमुळे 1 लाख नागरिकांचा मृत्यू
फिर्यादी सलीम यांच्या घराशेजारी राहणारा आरोपी आयुब गुलाब कुरेशी (२५ रा.कसाब गल्ली, बारामती) हा सलीम यांच्या घरासमोर आला. त्याने मुलगा कैफ कुरेशी याच्या सोबत जरा बाहेर जाऊन येऊ, असे म्हणत त्याला सोबत घेऊन गेला. त्यानंतर आरोपीने आयुबने कैफ याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गालावर, मानेवर धारधार शस्त्राने वार केले. त्यानंतर त्याला शहरातील बुरुड गल्ली येथील विहिरीत ढकलून दिले, असे तक्रारदार सलीम कुरेशी यांनी म्हटले आहे.