पुणे - कोरोनामुळे रक्ताची नाती दुरावले असले तरी माणुसकीची नाते अद्यापही कायम असल्याचा संदेश पिंपरी-चिंचवडमधील 'पौर्णिमा सोनवणे युवा प्रतिष्ठान'ने दाखवून दिला आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर अनेकांवर निगडीच्या अमरधाम स्मशानभुमीत महानगर पालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु, अस्थिविसर्जन करण्यात आले नाहीत. याकडे नातेवाईकांनी देखील पाठ फिरवली आहे. अशावेळी 'पौर्णिमा सोनवणे प्रतिष्ठान'ने पुढे येऊन दहा कोरोना बाधित रुग्णांच्या अस्थी विधिवत पूजा करून इंद्रायणी नदीत विसर्जित केल्या आहेत. त्यांच्या या कृतीचे शहरात कौतूक करण्यात येत आहे.
हेही वाचा - असंवेदनशीलतेचा कळस..! अहमदनगरमध्ये एकाच रुग्णवाहिकेत कोंबले 12 कोरोनाबाधितांचे मृतदेह
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सोनवणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बधितांनी 29 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मृत्यूचे प्रमाणही शहरात वाढत आहे. यामुळे शहरात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक नातेवाईक त्यांच्या अस्थी घेण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे आम्ही अस्थिविसर्जनाचा निर्णय घेतला असून विधिवत पूजा करून इंद्रायणी नदीत अस्थिविसर्जित केल्या आहेत. नागरिकांनी स्वतःची काळजी घेत, सामाजिक अंतर पाळावे आणि मास्क वापरावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
हेही वाचा - भरपावसात मुंबईतील उघड्या मॅनहोलजवळ तब्बल ७ तास उभ्या होत्या कांताबाई.. जाणून घ्या सविस्तर