पुणे - सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या पत्नीने पोलीस ठाण्याच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार आज सकाळी १० वाजताच्या सुमारास हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारात घडला. पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेच्या पतीला सेवेतून निलंबीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पीडित महिला आज सकाळी १० वाजताच्या सुमारास हडपसर पोलीस ठाण्याच्या आवारात आल्या. यावेळी त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
पोलीस कर्मचारी राहुल वेताळ यांनी आपल्यावर जबरदस्ती केली असून त्याची तक्रार दिल्याचे पीडितेने सांगितले. परंतु पोलीस त्याच्यावर कुठलीच कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस माझ्यावर दबाव आणत असून माझ्यावर व माझ्या पतीवर खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे जीवन संपवून घेणे हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.