पुणे - पुण्यातून खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपीने बुधवार पेठेतील त्याच्या प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे करून बॅगेत भरून त्या बॅगा लवासा परिसरातील निर्जन भागात फेकून दिल्या. संबंधित तरुणी मिसिंग असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुणाला अटक केली आहे.
हेही वाचा - केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक होऊ शकते पण... - कायदेतज्ज्ञ असीम सरोदे
कविता चौधरी उर्फ रोजिना रियाज पानसरे (वय ३०) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी हनुमंत शिंदे (वय ४०, रा. फरासखाना) याला अटक केली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता चौधरी ही बुधवार पेठेत देहविक्री व्यवसाय करत होती. 12 ऑगस्टपासून ती अचानक बेपत्ता झाली होती. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी मिसिंग असल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता तिचे आरोपी हनुमंत शिंदे याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी हनुमंत शिंदेला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.
हनुमंत शिंदे याचा विवाह झाला होता, तरी देखील त्याचे कविता चौधरीसोबत प्रेमसंबंध होते. त्याने बुधवार पेठेतच कविताला भाड्याने खोली घेऊन दिली होती आणि दोघे या ठिकाणी राहत होते. दरम्यान हनुमंत हा पहिल्या पत्नीकडे देखील अधून मधून जात होता. यावरून कविता आणि हनुमंत या दोघांमध्ये वाद व्हायचे. कविता हिला दारूचे देखील व्यसन होते. दारू पिल्यानंतर ती हनुमंतला शिवीगाळ करत असे. तिच्या या त्रासाला तो कंटाळला होता, त्यामुळे दोन दिवस तिच्याकडे तो गेला नव्हता.
दरम्यान 12 ऑगस्ट रोजी तो कविताला भेटण्यासाठी गेला असता त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. रागाच्या भरात हनुमंतने कविताचा गळा आवळून तिचा खून केला आणि पसार झाला. दोन दिवसांनंतर परत घरी येऊन त्याने कविताच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले आणि तीन वेगवेगळ्या बॅगेत भरले आणि या बॅगा त्याने लवासा परिसरातील निर्जन भागात फेकून दिल्या. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - सिंहगडावरील स्थानिक व्यावसायिकांच्या अडचणींकडे शासनाचे दुर्लक्ष