पुणे - कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राज्यातील कारागृहात असणाऱ्या कैद्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कारागृह प्रशासनाने विविध उपाययोजना राबवल्या होत्या. त्यातील एक म्हणजे कारागृहातील गर्दी टाळण्यासाठी काही कैद्यांना तात्पुरत्या जामीनावर बाहेर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय झाल्यानंतर राज्याच्या वेगवेगळ्या कारागृहातील तब्बल 13 हजार कैदी कारागृहाबाहेर आहेत. जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येणार नाही तोपर्यंत या कैद्यांना कारागृहात घेता येणार नसल्याचे, राज्याचे कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी सांगितले. कोरोना काळात राज्याच्या तुरुंगातील परिस्थिती कशा प्रकारे हाताळली त्याची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
...तर पुन्हा कारागृहात घेणार -
न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहातील गर्दी टाळण्यासाठी पाच वर्षापेक्षा कमी शिक्षा असणारे आणि किरकोळ गुन्ह्यातील कैद्यांना तात्पुरत्या जामीनावर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्याच्या वेगवेगळ्या कारागृहातील 13 हजार हुन अधिक कैदी तुरुंगाबाहेर आहेत. जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येणार नाही तोपर्यंत या कैद्यांना पुन्हा कारागृहात घेणार असल्याचे सुनील रामानंद यांनी स्पष्ट केले. तुरुंग प्रशासनाच्या या निर्णयामुळे मात्र राज्यातील वेगवेगळ्या शहरात गुन्हेगारी मध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गुन्ह्यांमध्ये वाढ -
एकट्या पुणे शहराचा विचार केला तर मागील काही दिवसांपासून शहरात हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे. तात्पुरत्या जामीनावर बाहेर असलेल्या गुन्हेगारांकडून मारहाणीच्या घटना होत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय शहरातील स्ट्रीट क्राईममध्ये वाढ झाली आहे. शहरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तर वर्चस्ववादातून कुणाच्या घटना घडल्याचे देखील समोर आले आहे. तात्पुरत्या जामीनावर तुरुंगाबाहेर पडलेल्या दोन ते तीन कैद्यांचा पुण्यात खून झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे तुरुंग प्रशासनाने घेतलेला निर्णय जरी कैद्यांच्या पथ्यावर पडत असला तरी शहर मात्र अशांत होत असताना दिसून येत आहे.