पणजी - केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी आज (शनिवारी) गोवा विधानसभेला भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्याशी चर्चा करत महिला आणि बालकल्याण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे केंद्रीय मंत्री इराणी यांच्या भेटीविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, त्यांनी विधानसभा प्रवेशद्वारावर येताना आणि माघारी जाताना माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलणे टाळले. इराणी यांच्या दौऱ्याविषयी गोव्याचे आरोग्य मंत्री राणे यांना माहिती विचारली असता ते म्हणाले, केंद्रीय मंत्र्यांनी आज भेट देऊन महिला आणि बालकल्याण विभागाची आरोग्य खात्याशी कशी सांगड घालता येईल, या विभागाला कोठे लक्ष देण्याची गरज आहे, याविषयी या बैठकीत सविस्तर माहिती दिली, असे सांगितले.
राणे म्हणाले, बालसुधारगृहात १८ वर्षांवरील मुलींना ठेवता येणार नाही. यासाठी या सुधारगृहांचा आढावा घेण्यास इराणी यांनी सांगितले. तसेच खात्याला कोणत्या ठिकाणी लक्ष देणे आवश्यक आहे हेही सांगितले. राज्यात 'दत्तक' प्रक्रियेचा आढाला घेतला जाईल. तसेच अनावश्यक समित्या रद्द केल्या जातील. आमच्याकडे निधी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचा नियंत्रणात खर्च करण्यास सांगितले आहे. कारण नीती आयोग आणि केंद्र सरकार यांच्या समोर आम्हाला आमची गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. हे सर्व करत असताना या विभागाचे डिजीटायझेशन करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली. ज्यामुळे या संबंधित माहिती सहज उपलब्ध असेल. आजची बैठक माझ्यासाठी महत्वपूर्ण होती. या बैठकीसाठी आरोग्य, महिला आणि बालविकास खात्याचे अधिकारी उपस्थित होते.