पणजी - जागतिक स्तरावर भारताची सौम्य शक्ती वाढवण्यासाठी देशातील पर्यटन क्षमतांचा पुरेपूर वापर करून घ्यावा, असा सल्ला उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आदरातिथ्य उद्योगांना दिला आहे. ‘अतिथी देवो भव’ या भारताच्या मूल्याचा संदर्भ देत, उपराष्ट्रपती म्हणाले की आपली संस्कृती, आपले खाद्यपदार्थ आणि परदेशातील लोकांचे स्वागत करण्याच्या वृत्तीमुळे आपण भारतात अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करू शकतो.
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त, स्वामी विवेकानंद यांना श्रद्धांजली वाहत उपराष्ट्रपतींनी स्वामीजींच्या शिकवणीचे स्मरण केले. युवकांनी त्यांच्या आदर्शांचे पालन करावे आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल करावी, असे नायडू म्हणाले.
हॉटेल व्यवस्थापन शिक्षण संस्था
आयएचएम गोवा, येथे युवा विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना नायडू यांनी पर्यटन क्षेत्राचे देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्व अधोरेखित केले. भारतात पर्यटनामुळे 87.5 दशलक्ष, म्हणजेच, 2018-19 मधील सुमारे 12.75% लोकांना रोजगार मिळाला आहे. कोरोना महामारीच्या काळात या क्षेत्राला सर्वाधिक फटका बसल्याचे नमूद करत, ही मंदी तात्पुरती असून हे क्षेत्र नव्याने पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याच संदर्भात बोलतांना उपराष्ट्रपतींनी विश्वास व्यक्त केला की परिस्थिती निवळल्यावर लोकांना पुन्हा एकदा प्रवास आणि पर्यटन करायला आवडेल. अशावेळी देशांतर्गत पर्यटनाला चालना दिल्यास, पर्यटन क्षेत्राला उभारी मिळेल, इतर देश केवळ परदेशी पर्यटकांवर अवलंबून असताना, भारतात देशांतर्गत पर्यटनातून पुन्हा उद्योग उभा करता येईल, असे नायडू म्हणाले. कोविड संपल्यानंतर लोकांना भारतातच कुठेतरी जाण्याचा उत्साह येईल आणि यातूनच पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगांना संधी निर्माण होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अशावेळी स्वदेश दर्शन आणि प्रसाद यांसारख्या योजनांच्या माध्यमातून पर्यटन बाजारपेठ पुन्हा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
बाहर जाने से पहले, देखो अपना देश
त्याशिवाय, आपल्या आजूबाजूच्या राज्यातील स्थानिक पर्यटन स्थळे बघण्यासाठी लोकांनी जावे, असे आवाहनही उपराष्ट्रपतींनी केले. भारताच्या समृद्ध अशा नैसर्गिक आणि सांस्कृतिक सौंदर्याचे कौतुक करतांनाच उपराष्ट्रपती म्हणाले की, सर्व युवकांनी कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारक, अंदमान येथील सेल्युलर जेल आणि गुजरातमधील स्टॅच्यु ऑफ युनिटी ला नक्की भेट द्यावी.
देशांतर्गत पर्यटनाला चालना देणाऱ्या सरकारच्या अभियानाचा उल्लेख करत, ‘बाहर जाने से पहले. देखो अपना देश” असे आवाहन त्यांनी केले. पर्यटनाला पुन्हा चालना देण्यासाठी आदरातिथ्य विभागाने पर्यटकांचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे असून, त्यासाठी आदरातिथ्य विभागाने कोविड विषयक सर्व नियमांचे पालन काटेकोर पालन करावे, अशी सूचना त्यांनी केली.
एक भारत-श्रेष्ठ भारत उपक्रमाचे कौतुक
‘साथी’ सारख्या उपक्रमांच्या मदतीने हॉटेल व्यावसायिकांना आपली हॉटेल्स स्वच्छ ठेवणे, ग्राहकांचा विश्वास जिंकणे आणि एक दर्जेदार हॉटेल म्हणून नाव मिळवणे, यात मदत मिळू शकेल. यावेळी नायडू यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. या क्षेत्रातल्या युवकांनी जास्तीत जास्त भाषा शिकण्याचे प्रयत्न करावेत, मात्र मातृभाषा बोलणे सुरूच ठेवावे अशीही सूचना त्यांनी केली. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमांना शिस्त आणि चिकाटीची जोड दिल्यास, कोणत्याही क्षेत्रात प्राविण्य मिळवता येते, असे उपराष्ट्रपती म्हणाले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही दबावाखाली नाही तर आनंदाने काम करावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
यावेळी नायडू यांनी गोव्याचे महत्वही सांगितले. गोव्याच्या समृध्द नैसर्गिक सौंदर्यामुळे अनेक परदेशी आणि देशी पर्यटक इथे आकर्षित होतात. या राज्यात लोकांना कलेपासून ते उत्सवांपर्यंत अनेक आकर्षण केंद्रे आहेत, असे त्यांनी सांगितले. नायडू यांनी सरकारच्या ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचेही कौतुक केले. या अंतर्गत, गोवा आणि झारखंड राज्यांमध्ये सांस्कृतिक देवघेव करण्यात आली आहे. अशा उपक्रमामुळे भारताच्या विविधतेतील एकता अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोव्याचे राजशिष्टाचार मंत्री मॉविन गुदिन्हो आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.