पणजी - गोवा विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीआहे. दोन दिवस चालणारे हे सरकारचे शेवटचे अधिवेशन आहे. अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन फार महत्वाचे मानले जात आहे. आगामी चार महिन्यात करावयाच्या महत्वाचा कामांना या अधिवेशनात मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप सरकारचा असणार आहे.
अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे -
मागच्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबतच भूमिपुत्र बिल, बेरोजगारी, महादेई नदीचा प्रश्न, रस्त्यावरील खड्डे, दहा हजार नोकऱ्या या मुद्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरणार आहेत.
राज्यातील काँग्रेस, महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड हे विरोधी पक्षच मागच्या काही दिवसांपासून एकसंग नसल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसने युतीचा प्रस्ताव नाकारल्याने विरोधातच एकी नाही. त्याचा फायदा सत्ताधारी भाजपला नक्कीच होणार आहे.
हे ही वाचा - देवेंद्र फडणवीसांसारख्या समजदार नेत्याने 'याचा' विचार करावा - छगन भुजबळ
आम्ही विरोधकांचा सामना करायला तयार - उपमुख्यमंत्री
आम्ही मागच्या साडेचार वर्षात २४ हजार कोटींची कामे केली आहेत. विरोधकांना सभागृहात तोंड देण्यासाठी आणि हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले.