पणजी (गोवा) - गोवा राज्यात चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मागच्या 24 तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा देखील बंद पडली आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी मोठी मदत करत राज्यात ठिकठिकाणी पडलेली झाडे बाजूला केली आहेत. अजूनही मदतकार्य सुरु आहे. दरम्यान पावसाची रिपरिप अजूनही काही प्रमाणात सुरूच आहे.
अग्निशमन दलाला आले एक हजारपेक्षा जास्त कॉल
अग्निशमन दलाच्या वेगवेगळ्या विभागात शनिवारी रात्रीपासून फोन सुरू होते. रविवारी संध्याकाळपर्यंत एक हजार पेक्षा जास्त कॉल आहेत. यात पणजीतून १२० पेक्षा जास्त, म्हापशातून १९४ पेक्षा जास्त, पिळर्ण येथून २५० पेक्षा जास्त, पेडणेतून १०० पेक्षा अधिक, डिचोलीहून ४८ पेक्षा जास्त आणि मडगाव ८० पेक्षा जास्त कॉल आले होते. वादळामुळे रस्ते, घरांवर पडलेली झाडे, विद्युत खांब हटविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली. राज्यातील विविध भागांतून आलेल्या कॉल्सना प्रतिसाद देतांना त्यांची तारांबळ उडाल्याची माहिती दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
मजलावाडा-हणजुणे येथील शीतल महादेव पाटील (३४) या अविवाहित तरुणीचा अंगावर माड पडून मृत्यू झाला. तर दुचाकीवरून पालसरेहून माशेलला जात असलेल्या किशोर उर्फ केशव जगन्नाथ नाईक (४७) व श्याम नाईक यांच्या अंगावर विजेचा खांब कोसळला. त्यात किशोर नाईक यांचे इस्पितळात नेताना निधन झाले, तर श्याम नाईक गंभीर जखमी असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. याशिवाय सकाळी वास्को येथे घरावर झाड पडून त्यातील तिघेजण गंभीर जखमी झाले. तर, उंडीर-फोंडा येथील जयराम नाईक यांच्यावर झाड कोसळल्यानेही तेही जखमी झाले आहेत. सर्वच जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बागा-शापोरात नांगरलेल्या मच्छिमार नौकांचे नुकसान
कळंगुट मधील बागा, तसेच शिवोलीतील शापोरा जेटीवर नांगरून ठेवलेले मच्छिमार नौकांचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. तसेच पाण्याच्या प्रवाहाने समुद्राच्या दिशेने गेल्याने भरकटलेले ट्रॉलर्स पुन्हा किनाऱ्यावर आणताना स्थानिक मच्छीमारांची तारांबळ ऊडाल्याचे येथील बोट असोशियशनचे चेअरमन बलभीम मालवणकर यांनी सांगितले आहे. बागा खाडीच्या तीरावर मासळीसाठी वापरात आणावयाच्या होड्या, तसेच पर्यटक बोटीमध्ये समुद्राचे खारे पाणी आत घुसल्याने बोटींची आसनव्यवस्था तसेच किंमती लाकूड खराब झाले आहे. त्यामुळे बोट मालकांना आर्थिक नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Cyclone Tauktae LIVE Updates : तौक्तेची तीव्रता वाढली; मुंबईत लोकल वाहतूक ठप्प, विमान सेवेवरही परिणाम..