पणजी (गोवा) - येत्या 30 मे रोजी गोवा घटक राज्य दिवस आहे. त्यादिवशी आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने कोणते कार्यक्रम करता येतील, याविषयी सर्व मंत्र्यांकडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सूचना मागवल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सचिवांची बैठक मंत्रालयात घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. तर 12 वीच्या परीक्षेबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उपक्रमाची घोषणा करण्याची शक्यता -
घटक राज्य दिनाच्या निमित्ताने कोविड प्रतिबंधात्मक अशी कोणती तरी योजना सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी सचिवांसोबत चर्चा केली. विविध खात्यांत कोणते उपक्रम सुरू आहेत. कोणते उपक्रम 30 मे रोजी नव्याने सुरू करता येतील वा एखादा नवा उपक्रम सुरू करता येईल काय ? याची चाचपणीही मुख्यमंत्र्यांनी सचिवांसोबत घेतलेल्या या बैठकीत केली. त्यांनी विविध खात्यांकडून कोविडकाळात राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचाही आढावाही घेतला.
सूचनांचा घेतला आढावा -
या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की यंदा कोविडचा प्रादूर्भाव असल्याने घटक राज्य दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करता येणार नाही. त्यामुळे आभासी पद्धतीने, पण चांगल्या रीतीने हा दिवस साजरा करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याविषयी पूर्वतयारीसाठी सचिवांची बैठक घेतली. विविध खात्यांकडून आलेल्या सूचनांचा आढावा घेतला आहे. सहकारी मंत्र्यांकडूनही घटक राज्य दिन साजरा करण्याविषयी कल्पना मागवल्या आहेत. त्याविषयी सरकार निर्णय घेईल. ते म्हणाले, आभासी पद्धतीने घटक राज्य दिन साजरा करावा लागणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोविड महामारी प्रतिबंधक, असा कोणता उपक्रम त्या दिवशी सुरू करता येईल का? याचाही विचार सुरू आहे. दरम्यान 12 वीच्या परीक्षांबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
30 मे रोजी गोवा घटक राज्य दिवस -
'गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने 30 मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. 1961 मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे 450 वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱयांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्धलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे.