पणजी - आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असलेले गोवा शांत ठिकाण आहे. मात्र, भविष्यात देखील गोव्याची ही ओळख कायम रहावी यासाठी प्रत्येक आस्थापनाने काळजी घेतली पाहिजे. सुरक्षेसाठी कसे सतर्क राहिले पाहिजे, याविषयी गोवा पोलिसांनी किनारी भागातील हॉटेल्स, कँसिनो आणि क्लब चालकांशी संवाद साधला.
आल्तिनो-पणजी येथील पोलिस सभागृहात हा मार्गदर्शन आणि संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, उपविभागीय पोलीस अधिकारी एडविन कुलासो, उत्तम राऊत देसाई, दहशतवाद विरोधी पथकाचे उपअधीक्षक महेश गावकर उपस्थित होते.
मोसमी पाऊस परतीच्या वाटेवर असल्याने गोव्यातील पर्यटन हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होतील. त्यामुळे गोव्यातील पर्यटन उद्योगाशी निगडित किनारी भागातील हॉटेल्स, कँसिनो आणि क्लब उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले.
हेही वाचा - चिमुकला झाला 'बुलेटराजा', वडिलांनी घरीच तयार केली 'बोन्साय बुलेट'
गोवा जरी शांत असला तरी शांतता भंग होण्यासाठी वेळ लागत नाही. त्यामुळे आस्थापनांनी कशाप्रकारे सुरक्षिततेची उपाययोजना केली पाहिजे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले पाहिजे. त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याबरोबरच सतर्कता कशी बाळगावी याविषयी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. म्हणून पोलीस विभागातर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी उत्तम राऊत देसाई यांनी दिली.
काही दिवसातच सागर कवच (मॉकड्रील) होणार आहे. तेव्हा कशा प्रकारे सुरक्षा घेण्यात येते हे समजेलच परंतु, आपल्यावर हल्ला होऊ नये यासाठी त्यांनी काळजी घेतली पाहिजे. जर काही आस्थापनांना प्रशिक्षणाची गरज असेल, तर ते गोवा पोलीस देण्यास तयार आहेत, असेही देसाई म्हणाले.