पणजी - गोव्याचे मंत्री आणि आमदार मायकल लोबो ( Michael Lobo Likely to Quit BJP ) सध्या भाजपात नाराज असून लवकरच ते इतर पक्षाची वाट धरण्याच्या तयारीत आहेत. जाता-जाता त्यांनी भाजपावर निशाणा साधत भाजपा हा सध्या कमर्शिअल पक्ष झाल्याचा टोला त्यांनी लगावला.
आपल्या पत्नीला शिवोली मतदारसंघात भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी मायकल लोबो इच्छुक आहेत. मात्र, त्याला पक्षाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे लोबो मागच्या काही दिवसांपासून पक्षात नाराज आहेत. त्यामुळे आगामी काळात ते कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान मंगळवारी संध्याकाळी त्यांनी अरपोरा येथे फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यावेळी ते म्हणाले, की मोदींसोबत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी माझे आदर्श आहेत, त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते.
भाजपा आता कॅमर्सिअल पक्ष -
भाजपात सध्या इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांना पायघड्या घातल्या जात आहेत. नुकतेच सालीगाव चे आमदार जयेश साळगावकर यांनी भाजपात प्रवेश केला होता, त्यामुळेच मंत्री मायकल लोबो नाराज आहेत. दरम्यान बाहेरच्या नेत्यांना पायघड्या घातल्यामुळे पक्षातील मूळचे जुने कार्यकर्ते नाराज होत आहेत. त्यामुळे रेडिमेड निवडून येणाऱ्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपा हा कमर्शिअल पक्ष झाल्याची टीका लोबो यांनी केली आहे..
पुतळ्यावरून राजकारण पेटले -
अरपोरा येथे फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याचा पुतळा बसविण्यात आला आहे. मात्र. परदेशी खेळाडूचा पुतळा बसविल्यामुळे त्याला काही हिंदू संघटनांनी विरोध केला आहे. त्याला प्रतिउत्तर देताना लोबो म्हणाले, की नको तिथे राजकारण करू नका. प्रत्येक माणसाकडून आदर्श घ्या.
हेही वाचा - Ajit Pawar Reply : राज्य कसं चालवायचं ते आम्हाला कळतं; अजित पवारांचा विरोधकांना टोला