पणजी - ' म्हादई' प्रश्न हाताळण्यात गोवा सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने मागणी केली आहे. तसेच आता आपण हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले.
आज पणजीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार विजय सरदेसाई यांनी केंद्राने कर्नाटक सरकारला दिलेले पत्रच सादर करून सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केली.
सरदेसाई म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून सावंत यांनी राजीनामा द्यावा याला अनेक कारणे आहेत. जसे की, कर्नाटकने 26 एप्रिल 2019 रोजी केंद्राला पत्र दिले. याची गोवा सरकारला काहीच माहिती नाही हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. तसेच 9 सप्टेंबर रोजी कर्नाटकचे खासदार असलेले केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर म्हटले होते की, त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी एका तारांकित हॉटेलमध्ये चर्चा केली. त्यामुळे ही काय चर्चा झाली हे गोव्याच्या जनतेला समजला पाहिजे.
सरकार जरी अपयशी ठरले असले तरीही गोवा फॉरवर्ड पक्ष राष्ट्रीय हरित लवादाकडे यावर दाद मागणार आहे, असे सांगून सरदेसाई म्हणाले, यासाठी गोव्याचे माजी अँडव्होकेट जनरल दत्ता लवंदे यांची मदत घेणार आहोत. तसेच गोव्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे याला पाठिंबा असून आमदारांनी आपापली भूमिका स्पष्ट करावी. विशेषतः उत्तर गोव्यातील ज्या सहा तालुके यामुळे प्रभावित होणार आहेत तेथील आमदारांनी स्पष्ट करावी. आम्ही गप्प बसणार नसून गावोगावी सरकारचा भांडाफोड करणार आहेत.
भाजपने गोवा फॉरवर्डला सरकारमधून बाहेर करेपर्यंत आपण काय भूमिका घेतली होती? असे विचारले असता सरदेसाई म्हणाले, याविषयी कधीच तडजोडीचची भूमिका घेतली नाही. तसेच आता आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटकपक्ष असलो तरीही गोव्यातील भाजप सरकारला पाठिंबा दिलेला नाही. वेळ येताचा पुढील निर्णय घेण्यात येतील. तर गोव्यातून दिल्लीत जाणाऱ्या भाजपमंत्र्यांवर टीका करताना ते म्हणाले हे जनतेच्या हितासाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी जात असतात.