गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस - pramod sawant corona news
व्यवसायाने डॉक्टर आणि फ्रन्टलाईन वर्कर म्हणून मी नोंदणी केली होती. त्यानुसार आज माझा डोस घेण्याची वेळ होती. म्हणून लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यानंतर काहीच त्रास जाणवलेला नाही. सुमारे अर्धा तास येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली बसूनही होतो.
पणजी (गोवा) - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सकाळी १० वाजताच्या सुमारास उत्तर गोव्यातील साखळी येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस आज घेतला. त्यानंतर अर्धातास तेथे बसून राहिल्यानंतर ते आपल्या कामकाजासाठी निघून गेले.
व्यवसायाने डॉक्टर आणि फ्रन्टलाईन वर्कर म्हणून मी नोंदणी केली होती. त्यानुसार आज माझा डोस घेण्याची वेळ होती. म्हणून लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यानंतर काहीच त्रास जाणवलेला नाही. सुमारे अर्धा तास येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली बसूनही होतो. कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शास्त्रज्ञ, प्रयोगशाळा तज्ञ यांचे आभार व्यक्त केले. तसेच डॉ. सावंत म्हणाले, लसीकरणाचा हा तिसरा टप्पा आहे. यामध्ये 45 ते 60 वयोगटातील लोकांना लस दिली जात आहे. लस सुरक्षित आहे. कालपासून जाग्यावर लस उपलब्ध करून दिली जात आहे. सरकारी इस्पितळात मोफत तर यापूर्वी नोंदणी केलेल्या खासगी इस्पितळात केंद्राने निश्चित केलेल्या दरामध्ये लस उपलब्ध आहे.
लोकांनी अधिकाधिक पुढे येऊन अधिकाधिक लसिकरण करून गोवा लवकराता लवकर कोरोना मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे. मात्र, यासाठी इस्पितळात गर्दी करण्याची आवश्यकता नाही. सध्या खासगी इस्पितळात जाग्यालरील नोंदणी बंद आहे.
हेही वाचा - राष्ट्रपती कोविंद यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
लॉकडाऊन करणे योग्य ठरणार नाही -
कोविड रुग्णांची संख्या कमी-जास्त होताना दिसत आहे. अशा स्थितीत राज्यात पुन्हा लॉकडाऊन करणे योग्य ठरणार नाही. कारण राज्याच्या अर्थव्यवस्थेचाही विचार केला पाहिजे. तसेच जरी रस उपलब्ध झाली असली तरीही लोकांनी मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर यांचे पालन केले पाहिजे. तसेच एखाद्यास कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळली तर त्यांनी वेळीच तपासणी करून घ्यावी. तसेच ज्यांनी यापूर्वी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी 28 दिवसांनंतर येणारा दुसरा डोस पूर्ण करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.