पणजी - लोकांनी जनता कर्फ्युला सहकार्य करावे. सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहेत. लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवठा कसा होईल, याचे सरकार नियोजन करत आहेत. त्यासाठी आवश्यक हेल्पलाईन सुरू केल्या जाणार आहेत. तसेच जे स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक आहेत, अशांची जवळच्या पोलिस स्टेशनशी अर्ज सादर करावा, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.
आल्तिनो-पणजी येथील महालक्ष्मी निवासस्थानी आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्री, उच्च स्तरीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन या परिस्थितीत कसे लढायचे याविषयी नियोजन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ''रास्त धान्य दुकानदारांनी घरपोच धान्य वितरण करावेत, यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत. सरकारही लोकांच्या मदतीसाठी आरोग्य विषयक आणि औषध याविषयी माहिती देवाणघेवाण करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करणार आहे. यासाठी स्वयंसेवक आणि पोलिसही मदत करणार आहेत. अनेकांनी स्वयंसेवक होण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यांची नियुक्ती ही पूर्ण तपासणीनंतर करण्यात येईल. इच्छुकांनी जवळच्या पोलिस स्थानकात अर्ज सादर करावा. त्यानंतर पडताळणी करून त्या-त्या क्षेत्रातील स्वयंसेवकांची मर्यादित काळासाठी भरती केली जाईल.
'' परराज्यातून प्रवास करून आलेल्यांनी स्वतः होम कोरनटाईन बनून रहावे. यावर पाळत ठेवण्यासाठी मेजिस्ट्रेट नेमणूक केली जाणार आहे. जे होमकोरनटाईन फिरतात. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, प्रसंगी पोलिस स्थानक अथवा तुरुंगातही ठेवण्यात येईल,'' असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
गोव्यातील लोकांना पुढील 21 दिवस पुरेल एवढा धान्यसाठा गोवा सरकारकडे आहे, असे सांगून मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गोव्यात व्हायरलॉजी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी आज सकाळी संरक्षण दलाच्या विशेष विमानाने गोव्याचे वैद्यकीय पथक प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे. जे येथे येऊन कार्यरत राहिल, ज्यामुळे अधिक वेगाने आणि कमी वेळात संशयितांची तपासणी करता येणार आहे.