पणजी - सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोव्यातील अनेक भागांत पूरसदृष्यस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही भागांचा संपर्क तुटला आहे. यामुळे गोवा सरकारने सर्वच प्राथमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये आणी विशेष शाळांना बुधवारी सुट्टीजाहीर केली आहे. राज्यात ' हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
चार दिवसांपासून राज्यात संततधारपणे मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. सखल भागात पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा विचार करता मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार शिक्षण संचालनालयाने बुधवारी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.याविषयी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, सध्या पडत असलेल्या पावसाचा जोर पुढील सात दिवसांपर्यंत तसाच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. अशावेळी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील शाळांना एकदिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. पुढील परस्थीती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामध्ये सर्वत्र 'हाय अलर्ट' जारी करून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्वच धरणांतून पाणी सोडले जात आहे. यासाठी धरणाखाली नदी किनारी असलेल्या लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून काहींना थलांतरीत करण्यात आले आहे.पणजी-मळा भागातील पूरस्थीती विषयी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, आज सकाळीच या भागाची पाहणी केली आहे. या ठिकाणी असलेले तळे आणि भरतीसीमारेषा यांचा अभ्यास केला जाईल. काही ठिकाणी ' मानशी'चे काम व्यवस्थित करण्यात आलेले नाही. काही ठिकाणी समित्याही नाहीत, त्याचीही चौकशी केली जाईल.