पणजी - जगभरात आणि विशेषतः युरोपीय देशांत अडकलेल्या सुमारे 7 ते 8 हजार गोमंतकीय खलाशांना भारतात परत आणण्यासंदर्भात केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे. त्यांना परत आणल्यानंतर कशाप्रकारे होम क्वारंटाईन करता येईल यावरही विचार सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
महालक्ष्मी निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सावंत म्हणाले, बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्यासह गोमंतकीय खलाशी संघटनेने यासंदर्भात विचारणा केली होती. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही. परराष्ट्र खाते आणि अनिवासी भारतीय आयोगाच्या माध्यमातून संबंधित देशांच्या वकिलातींशी बोलणे सुरू असून त्यांना काय मदत मिळवून देता येईल, यावर भर देण्यात आला आहे.
कोरोना विषाणूशी लढताना जे कर्मचारी इस्पितळात सेवा देत आहेत, त्यांच्याशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला, असे सांगून मुख्यमंत्री सावंत म्हणाले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली. गोव्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या प्रयोगशाळेत काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे 55 नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळा दोन दिवसांत पुन्हा सुरू होईल. नवीन रुग्ण आढळून आलेले नाहीत. मात्र, जे क्वारंटाईन असूनही फिरताना आढळतात, त्यांच्या घरावर होम क्वारंटाईन स्टीकर मारण्यात येणार आहे, ज्यामुळे 14 दिवस जागृती राहील. आवश्यक साधनसामुग्री घेण्यासाठी 'गोवा आयर्न ओव्हर पर्मनंट फंड'मधील 30 टक्के म्हणजे सुमारे 120 कोटी रुपये या आपत्तीकरता वापरणार आहोत. केंद्रीय आरोग्य आणि गृहमंत्री यांच्याशी सातत्याने संपर्कात आहोत, असेही ते म्हणाले.
राज्यातील खासगी इस्पितळांनी आवश्यक काळजी घेत बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवावेत. तशी इंडियन मेडिकल असोसिएशनला विनंती करण्यात आली आहे. सरकारी बाह्यरुग्ण विभाग 15 एप्रिलनंतरच सुरू होईल, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले, गोव्यात आज दिवसभरात 88 ट्रक जीवनावश्यक वस्तू घेऊन आले आहेत. यामध्ये 25 किराणा माल घेऊन तर 55 ट्रक भाजीपाला घेऊन आले आहेत. जनतेला कोणत्याही वस्तुंची कमतरता भासू दिली जाणार नाही. मात्र, नागरिकांनी घरात राहून सहकार्य करावे. विविध ठिकाणच्या कामगारांची काळजी घेत त्यांना आवश्यक अन्नपुरवठा करण्यासाठी कामगार आयोग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलस्त्रोत खात्याचे अभियंता आढावा घेत आहेत. या काळात गोवा स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सरकारी खाती काम करत आहेत. ज्यामुळे स्वच्छता कायम राहण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.