पणजी - संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना विनंती करून संरक्षण दलाचे एक विमान उद्या (बुधवारी) उपलब्ध झाले आहे. त्यातून कोरोना निदान चाचणीविषयी प्रशिक्षणासाठी पुणे येथे एक वैद्यकीय पथक पाठवण्यात येणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. तसेच विशेष विमानाने 7 संशयितांचे नमुने तपासणीकरीता पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढले तरी तीन महिने लागणार नाही शुल्क
मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या मुख्यसचिवांसह राज्यपाल सत्यपाल मलिक यांची राजभवनात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी राज्यपालांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच राज्यात व्हायरालॉजी प्रयोगशाळा उभारण्याच्या कामाची चौकशी केली. त्याबरोबरच दररोज उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची सूचना केली. संचारबंदीच्या काळात गरजू आणि गरीब यांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतील याकडे लक्ष देण्यासही सांगितले.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महालक्ष्मी या सरकारी निवासस्थानी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,बुधवारी गुढीपाडवा आहे. त्याबरोबरच अन्य धर्मीयांचेही सण आहेत. परंतु, कोणत्याही धर्माच्या माणसांनी एकत्रित जमून धार्मिक प्रार्थना करू नये. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, गोव्यातील संशयितांचे आता पर्यंतचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. आज दिवसभरात विमानतळावर 11 जणांची तपासणी करण्यात आली. तर 17 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तर 23 मार्च रोजी पाठविलेल्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले नाही.