पणजी - विधानसभेच्या पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आज ७५.२५ टक्के मतदान झाले. पुरुषांपेक्षा महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. दिव्यांग मतदारांनी ८६.८२ टक्के मतदान झाल्याची माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी तथा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी आर. मेनका यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी आर. मेनका म्हणाल्या, पणजी मतदारसंघात २२ हजार ४८२ मतदारांपैकी १६ हजार ९२४ मतदारांनी हक्क बजावला. यामध्ये १० हजार ६९७ मतदारांपैकी ८ हजार ११९ तर ११ हजार ७८५ मतदारांपैकी ८ हजार ७९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदान १६ क्रमांकच्या केंद्रावर ८९.८६ टक्के तर सर्वात कमी १५ क्रमांकच्या केंद्रावर मतदान झाले. २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ७८.३८ टक्के तर त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ६९.९८ टक्के मतदान झाले.
पुढे बोलताना मेनका म्हणाल्या, ५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर संपूर्ण ईव्हीएम युनिट बदलण्यात आले. तर ६ आणि ९ क्रमांकाच्या केंद्रावर केवळ व्हीव्हीपँट बदलण्यात आले. मात्र, संपूर्ण दिवसभरात शांततेत मतदान पार पडले. दरम्यान, ३० क्रमांकच्या मतदान केंद्र परिसरात मतदारांना मतदानापासून रोखण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, ज्यांना रोखण्यात आले होते. त्यांनी त्यापूर्वी मतदान केले होते, असे सांगून मेनका म्हणाल्या, या घटनेची चौकशी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, दिवसभरात एकाही मतदारास मतदान करण्यापासून कोठेही रोखण्यात आलेले नाही.