पणजी - कोविड-19 च्या काळात आज पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत 31 कोविड बाधितांनी पीपीई किट परिधान करून मतदानाचा हक्क बजावला. दिवसभरात राज्यभरातील 1,187 मतदान केंद्रावर 48 मतदारसंघात 56.82 टक्के मतदान झाले. यासाठी मतपत्रिकेचा वापर करण्यात आला होता.
जिल्हा पंचायत निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि.14) सकाळी 8 वाजल्यापासून 15 ठिकाणी होणार आहे. गोव्यातील 48 मतदारसंघात 7 लाख 91 हजार 814 मतदारांपैकी 4 लाख 21 हजार 972 मतदारांनी हक्क बजावला.
हेही वाचा-दानवेंसह केंद्र सरकारचा शिवसेनेकडून निषेध; रोखला मुंबई-गोवा महामार्ग
- उत्तर गोव्यात 55 टक्के तर दक्षिण गोव्यात 56.82 टक्के मतदान झाले.
- कोविड महामारीच्या काळात होत असलेल्या या निवडणुकीत कोविड बाधितांनाही मतदानाचा हक्क बजावण्याची संधी दिली होती. यासाठी विशेष उपाययोजना करतानाच अशा मतदारांसाठी शेवटचा एकतास राखून ठेवण्यात आला होता. याचा लाभ 31 मतदारांनी घेतला.
- उत्तर गोव्यात 15 तर दक्षिण गोव्यात 16 जणांनी पीपीई किट परिधान करत मतदानचा हक्क बजावला. यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी उत्तर गोव्यातील खोर्जुवे मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबातील अन्य सहा बाधितांसह हक्क बजावला.
- ताळगाव मतदारसंघात मारिया फिगरेदो या 100 वर्षे वयाच्या वृद्धेने मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा-गोव्यात जिल्हा पंचायतीसाठी मतदान; मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क
आजचे मतदान मतपत्रिकेवर घेण्यात आले. परंतु, त्यावर 'नोटा'चा (वरीलपैकी एकही नाही) पर्याय देण्यात आला नव्हता. याविषयी गोवा निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांना विचारले असता ते म्हणाले, गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी तसा कायदा नसल्याने 'नोटा' चा पर्याय मतदारांना उपलब्ध झाला नाही. गोव्यातील सर्वाच केंद्रावर आणि शांततेत मतदान पार पडले. कोविड काळातही आपला हक्क बजावण्यासाठी मतदारमोठ्य संख्येने घराबाहेर पडले. याबद्दल गर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीही केले मतदान-
गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या साखळी विधानसभा मतदारसंघातील कोठंबी (उत्तर गोवा) गावातील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी त्यांच्या पत्नी तथा प्रदेश भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सुलक्षणा सावंत उपस्थित होत्या. यावेळी ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्हा पंचायतीला मोठा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.