नाशिक - त्रिपुरात अनुचित घडले म्हणून महाराष्ट्रात असे घडणे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या आहेत. तीन-चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP president Sharad Pawar) यांनी भाजपचे नाव न घेता केला आहे. ते पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, की एकेकाळी सत्तेत असलेले काही लोक शांततेला धक्का बसेल असे काम करत आहेत. है दुर्दैव आहे. राज्य सरकार चांगले काम करत असताना हे घडू नये. विरोधकांकडे मोदीसारखा प्रभावी चेहरा नाही, या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, की इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा त्यांच्या विरोधातही नेतृत्व नव्हते. मात्र सगळ्या शक्ती मोरारजी देसाई मागे उभ्या राहिल्या. त्यामुळे विरोधी पक्षाकडे चेहरा नाही, असे म्हणता येणार नाही.
नोंद घ्यावी, असे वाटत नाही
अभिनेत्री कंगना रणौतच्या विधानाशी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी सहमती दर्शवली होती. त्यावर बोलताना अशा लोकांच्या वक्तव्याची नोंद घ्यावी, असे मला वाटत नाही. आम्ही जुळवून घ्यायचे ठरविले आहे. त्यामुळे हे सरकार सुरू आहे. आज सरकार जाईल. उद्या जाईल. दिवस मोजायचे काम त्यांना करावे लागेल, असा टोला त्यांनी भाजपला (Sharad Pawar Slammed BJP) लगावला आहे.
हेही वाचा-जळगावमध्ये 1500 किलो गांजा जप्त; मुंबई एनसीबी पथकाची मोठी कारवाई
पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने नक्षलवाद कमी-
केंद्र सरकारला केलेली कामे दाखविता आली नाहीत. त्यामुळे धाडी टाकून त्याला वेगळे वळण दिले जात असल्याचे स्पष्ट मत शरद पवार यानी व्यक्त केले आहे. जनता हुशार आहे, त्यांना सर्व समजते. ते याबाबत योग्य ते निर्णय घेतील. महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद कमी आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने नक्षलवाद कमी झाला आहे. नक्षलवाद या नावावर काही भागांमध्ये आदिवासींवर अन्याय झाला. परंतु आता त्यांना सहानुभूती दाखवली पाहिजे. या उपेक्षित वर्गाला आतून बाहेर काढून न्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी आता राज्य सरकार पावले उचलत आहे. नक्षलवादी भागांमध्ये जलद गतीने विकास कामे झाली पाहिजे. त्यामुळे त्या भागातील जनजीवन अधिक चांगले होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा-दंगल घडवण्याचे भाजपचे षड्यंत्र.. दंगल हे भाजपचे शेवटचं हत्यार, नवाब मलिकांचा आरोप
महामंडळाचे विलीनीकरण हे शक्य नाही, कृपया तुटेपर्यंत ताणू नका
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on ST workers strike) म्हणाले की परिवहन महामंडळाचे विलीनीकरण हे शक्य नाही. त्याबाबत योग्य पर्याय काढला गेला पाहिजे. कृपया तुटेपर्यंत ताणू नका असा सल्ला पवार यांनी एसटी कामगार संघटनांना दिला आहे.