नाशिक: कोरोनामुळे दोन वर्ष लॉकडाऊन काळात,इतर रेल्वे गाड्यांसोबत नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची गाडी पंचवटी एक्सप्रेसचा प्रवास देखीलव बंद होता,आता कुठेतरी पंचवटीचा प्रवास सुखकर होण्यास सुरुवात झाली आहे. प्रवाशांना साधारण प्रवासाचे तिकीट उपलब्ध व्हायला लागले आहे. यातच पावसाळा सुरू झाला आणि खिडकीच्या चुकीच्या रचनेमुळे काही कोच मध्ये पावसाचे पाणी यायला सुरवात झाली. या सुधारणा केल्यानंतर आता पंचवटीच्या एसी टू या वातानुकूलित डब्यात इलेक्ट्रिकल डक्टरमधून थेट छतातून पाणी प्रवाशांच्या अंगावर पडत आहे.
एसी डब्यात प्रवाशांना भिजत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांनी गाडीत भिजु नये यासाठी डोक्यावर छत्री धरून प्रवास करण्याचा पर्याय निवडला आहे. पाहणाऱ्यांना मात्र हा प्रकार गम्मतशीर वाटत आहे. अनेकांनी हा प्रकार कॅमेरात कैद करत रेल्वे प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. रेल्वे प्रशासनाने आता तरी या प्रकाराची दखल घेऊन कोचची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे. पंचवटी एक्सप्रेस मधील समस्येबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार केली आहे, त्यामुळे ही समस्या लवकरच मार्गी लागेल, परंतु मेंटेनन्स विभागाने पंचवटी गाडीची पूर्ण तपासणी करणे गरजेचे आहे,असे रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी स्पष्ट केले आहे.