नाशिक - उद्यापासून नाशिकमध्ये दुचाकी चालकाने हेल्मेट घातले असेल, तरच त्याला पेट्राेल मिळणार आहे. त्यासाठी नव्याने अधिसूचनाही काढण्यात आली असल्याची माहिती पाेलीस उपायुक्त पाैर्णिमा चाैगुले-श्रींगी यांनी दिली. वारंवार विनंती करुन अनेक नागरीकाच्या डोक्यावर हेल्मेट दिसत नसल्याने पोलिसांनी ही शक्कल लढवली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पेट्रोलपंपावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
पाच वर्षात अपघातात एकूण ४९४ दुचाकीस्वार ठार -
नाशिक शहरामध्ये अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडून हेल्मेटसक्ती साठी विविध मोहीम हाती घेण्यात आल्याल आहेत. मात्र, तरीही नाशिककरांकडून हेल्मेट वापरण्यात येत नसल्याने आता जरा वेगळ्या पद्धतीने नाशिकमध्ये हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करणारी मोहीम राबवली जाणार आहे. २९ जुलैरोजी पाेलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी या संदर्भात आदेश निर्गमित केले आहेत. 'नाे हेल्नेट, नाे पेट्राेल' उपक्रमात नाशिक पाेलीस आयुक्तालयाच्या तेरा पोलीस स्टेशन हद्दीतील पेट्रोल पंप मालक व व्यवस्थापक सहभागी होणार आहेत. १५ ऑगस्टपासून नाशिकराेड पाेलीस ठाणे हद्दीतील पेट्रोल पंपावर दोन शिफ्टमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. हेल्मेट न वापरल्यामुळे मागील पाच वर्षात एकूण अपघातात ४९४ दुचाकीस्वार हे ठार झाले आहेत. या अनुषंगाने नागरिकांत जनजागृती व्हावी व त्यांची सुरक्षितता व्हावी, म्हणूण ही चळळळ सुरु करण्यात आली आहे.
'आमचा हेतू निखळ, स्वच्छ' -
उद्यापासून सुरु हाेणाऱ्या 'नाे हेल्मेट, नाे पेट्राेल'च्या चळवळीत आमचा हेतू निखळ आणि स्वच्छ आहे. पेट्राेलपंप धारकही या निर्णयाशी सहमत असून अपघाती मृत्यू राेखण्यासाठी या चळवळीत नाशिककरांनी सहभागी व्हावे. युवक वर्गाला हेल्मेटची सवय नसते म्हणून ते वापरत नही, हेल्मेटचे महत्व सकारात्मक समोर यावे, हेल्मेट वापरावे म्हणून ही मोहीम राबवली जात आहे. शहरातील प्रत्येक पेट्राेलपंप धारकाला सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे.
मोहिमेचे दुचाकी चालकांकडून स्वागत -
नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनने पोलीस आयुक्त पांडेय यांच्या ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ धोरणाला पाठिंबा देऊन हा निर्णय घेण्यास हाेकार दर्शविला. देशभरातील अनेक शहरांत अपयशी ठरलेल्या या योजनेला नाशिकला यशश्वी करण्याचे ठरले असून डीलर्स प्रतिनिधींनी जे नागरिक ऐकणार नाहीत, पेट्रोलपंपावर कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन करतील अशांबाबतीत पोलिसांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली हाेती. तर पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचे दुचाकी चालकांकडूनदेखील स्वागत करण्यात येत असल्याचे चित्र सध्या तरी बघायला मिळत आहे. नाशिक शहरात पेट्रोल पंप चालकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, की एखाद्या दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसेल, तर त्याला इंधन देऊ नये. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला बाईकस्वार कसे प्रतिसाद देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा - संजय राठोड अडचणीत! जबाबासाठी पीडित महिला घाटंजी पोलीस ठाण्यात