नाशिक - महिला सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या निर्भया पथकाने एकाच दिवशी 30 टवाळखोर तसेच रोडरोमियोंना धडा शिकवला आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाची स्थापना केली. यासाठी त्यांनी चार निर्भय पथके तयार केली आहेत.
या पथकांच्या माध्यमातून महिलांची छेड काढणाऱ्या तसेच त्यांना त्रास देणाऱ्या टवाळखोर तसेच रोडरोमियोंवर कारवाई करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून निर्भया पथक एकच्या प्रमुख पोलीस उप निरीक्षक योगिता जाधव यांनी एकाच दिवशी 30 टवाळखोर व रोडरोमियोंचा समाचार घेतला आहे. या पथकाने टवाळखोरांचे अड्डे शोधून त्यांच्यावर कारवाई केली आहे.
सीडीओ मेरी हायस्कूल परिसरात 20 टवाळखोर आणि रोडरोमियोंचा समाचार घेत 4 खटले दाखल केले आहेत. तर पंचवटी येथील तपोवनात येणाऱ्या भाविक महिला व युवतींना त्रास देणाऱ्या 10 जणांवर कारवाई करत 7 खटले दाखल केले आहेत. तसेच या पथकाकडून तरुण-तरुणींचे समुपदेशन करण्यात येत आहे. या पथकामुळे टवाळखोर व रोडरोमियोंमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.