नाशिक : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता नाशिक जिल्हा प्रशासनाने पूर्व तयारीला सुरुवात केली आहे. यानुसार ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून जिल्ह्यात जवळपास 40 ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यातील नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून शनिवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून जिल्ह्यात 40 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसाला 37 मेट्रीक टन ऑक्सिजन मिळणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याने ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे पाऊल टाकल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
दिवसाला 225 जम्बो सिलिंडर भरण्याची प्रकल्पाची क्षमता
जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाची दिवसाला 225 जम्बो सिलिंडर भरण्याची क्षमता असणार आहे. तसेच प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात निर्माण करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पाची क्षमता दिवसाला 125 सिलिंडरची असणार आहे. ग्रामीण रुग्णालयात 60 ते 70 जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती दिवसाला होणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये उद्योग विभागाकडून 70 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करणारा एक मोठा प्रकल्प प्रस्तावित आहे असेही भुजबळ यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था होण्यासाठी शासकीय व महापलिका रुग्णालयांत 40 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 24, केंद्र सरकारच्या वतीने 04, एचएएल व इंडिया सिक्युरिटी प्रेस सीएसआर फंडातून 4, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून 6 तर मालेगांव महानगरपालिकेच्या मध्ये एसडीआरएफ निधीतून 2 असे एकूण 40 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत. हे सर्व ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प जून अखेरपर्यंत कार्यन्वित होणार आहे.
हेही वाचा - अंगावरील कपडे काढताच रुग्णालयाने परत केले पैसे; नाशिकातील घटना