नाशिक - कोरोना लसीची प्रतीक्षा संपुष्टात आली असून उद्या शनिवार (दि. १६) जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. १३०० आरोग्य कर्मचार्यांना आज लस दिली जाणार आहे. आठवड्याला पाच हजार २०० आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जाणार आहे. प्रशासनाकडून लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण करण्यात आली असून कंट्रोल रुमद्वारे मोहिमेचे मानिटरिंग केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.
एकाच कंपनीच्या लसीचे दोन डोस द्यावे लागणार
जिल्ह्याला ४३ हजार ४४० लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात ३५ हजार ४९३ आरोग्य कर्मचार्यांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे. एकच कंपनीची लसीचे दोन डोस द्यावे लागणार आहेत. त्यामुळे महिनाभराच्या पहिल्या टप्प्यात १९ हजार ५४८ आरोग्य सेवकांना लस दिली जाईल. २८ दिवसांनी या आरोग्य कर्मचार्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात येईल. ज्यांना लस दिली जाईल त्यांना मॅसेज पाठवून माहिती दिली जाईल. लसीकरणासाठी शहरासह जिल्ह्यात १३ बूथ तयार करण्यात आले आहे. लस ठेवण्यासाठी बूथमध्ये कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरणाच्या ठिकाणी बाहेरील व्यक्तिचा हस्तक्षेप नको यासाठी पोलीस व होमगार्ड्सचा बंदोबस्त तैनात असेल. ग्रामीण भागात तहसिलदार व गटविकास अधिकार्यांच्या मार्फत लसीकरण मोहिमेवर लक्ष ठेवले जाईल. तसेच टास्क फोर्सद्वारे जिल्हाप्रशासन या मोहिमेचे मॉनिटरिंग करणार आहे.
तीन कक्ष व अत्यावश्यक सेवा
लसीकरणासाठी बूथवर तीन कक्षाची व्यवस्था असेल. पहिल्या कक्षात आरोग्य सेवकाची तपासणी केली जाईल. दुसर्या कक्षात लस दिली जाईल. तिसर्या कक्षात लस दिलेल्या व्यक्तिला बसवून साइड इफेक्ट जाणवत नाहीत ना याची दक्षता घेतली जाईल. काही लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचे पथक उपचारासाठी सज्ज असेल. तसेच १०२ व १०८ रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहतील.
'साइड इफेक्ट दिसल्यास घाबरू नये'
लसीकरणाच्या मोहिमेला उद्यापासून सुरुवात होत आहे. लस घेणे हे पूर्णपणे ऐच्छिक असेल. पहिल्या टप्प्यात १९ हजार ५४८ आरोग्य सेवकांना लस देण्यात येईल. लस घेतल्यावर साइड इफेक्ट दिसल्यास घाबरू नये. लसीकरण बूथवर अत्यावश्यक मेडिकल सुविधा व डॉक्टरांचे पथक सज्ज असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.