नाशिक - कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारसोबतच विविध संस्था व व्यक्ती मदतीला सरसावत आहेत. यामध्ये आनंद महिंद्रा यांचे नाव देखील आघाडीवर आहे. त्यांनी सरकारला 100 कोटींची मदत जाहीर केली आहे. इगतपुरीतील महिंद्रा कंपनीच्या प्लांटमध्ये गाड्यांच्या इंजिन ऐवजी रोज 500 व्हेंटिलेटरची निर्मिती करण्यात येत आहे.
देशात व्हेंटिलेटरचा तुटवडा बघता महिंद्रा यांनी हा निर्णय घेतलाय. गेल्या दोन दिवसांपासून या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. यात आयसीयू सोबत रुग्णवाहिकेत वापरात येणारे तीन विविध प्रकारचे व्हेंटिलेटरचे उत्पादन सुरू आहे. याबाबत अधिक माहिती महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितली आहे. महिंद्रा समूह सामाजिक बांधिलकीतून करत असलेल्या या कामाचे देशभरातून कौतुक होत आहे.