नाशिक - नागरिकांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाटत असून आता पंचांगमध्ये लग्न मुहूर्त नसले तरी कमी नागरिकांच्या उपस्थितीत शुभ दिवस बघून लग्न सोहळे पार पडत आहेत. त्यात आता 200 वऱ्हाडीच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यास सरकारने परवानगी दिल्यान नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
हेही वाचा - नाशिक : रॅगिंग करुन मित्राची हत्या, इंजिनिअरिंगच्या 7 विद्यार्थ्यांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल
गऊन काळ मुहूर्ताचा आधार
कोरोनाची तिसरी लाट येऊ नये अशी सर्वांची इच्छा आहे, मात्र आलीच तरी आपल्या धार्मिक कार्यात अडचणी येऊ नये म्हणून अनेक जण पंचांगमधील मुहूर्त न बघता गऊन काळ मुहूर्त (शुभ दिवस) बघून लग्न सोहळे पार पाडत आहेत आणि ही चागंली बाब असल्याचे अनिकेत शास्त्री महाराज यांनी सांगितले.
पंचांग विवाह मुहूर्त
विवाहचे प्रमुख मुहूर्त हे 15 जुलैपूर्वीच होते. आता पुढील मुहूर्त 15 नोव्हेंबरपासून 13 डिसेंबर या कालावधीत आहेत. मात्र, असे असले तरी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे अनेक नागरिकांचा मुहूर्त न बघता शुभ दिवस निवडून कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे उरकून घेण्याकडे कल वाढला आहे.
अन्यथा परवाने रद्द
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सरकारने निर्बंध शिथिल केले असून आता 50 ऐवजी 200 वऱ्हाडीच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, खुल्या लॉन्सवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित आसनव्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने, मात्र त्यातही जास्तीत जास्त 200 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालय, हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी सध्या लग्न मुहूर्त नसल्याने याचा फारसा दिलासा मिळणार नसल्याचे चित्र असल्याने केवळ साखरपुडा किंवा छोटे कार्यक्रम आयोजित होऊ शकतात.
दिवसभर परवानगी मिळावी
विवाहाला 200 लोकांची परवानगी देण्यात आली. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, मात्र शनिवार, रविवार दिवसभर कार्यक्रमाला परवानगी दिली तर नागरिकांच्या दृष्टीने ते सोयीस्कर होईल, तसेच कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने सरकार निर्बंध अजून शिथिल करतील, अशी अपेक्षा असल्याचे मंगल कार्यालय संचालक समाधान जेजुरकर म्हणाले.
बँड पथकांना रोजगार
गेल्या वर्षभरापासून 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे होत असल्याने आम्हाला काम मिळत नव्हते, त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली होती. आता सरकारने 200 नागरिकांना परवानगी दिल्याने आमच्या हाताला काम मिळणार असल्याने आनंद वाटत आहे, असे मत ओम ब्रान्स बँडचे नितीन देवरे यांनी व्यक्त केले.
लग्न समारंभासाठी 'या' आहेत अटी
कोणत्याही परिस्थितीत विवाह सोहळ्याशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे दोन लसीकरण झाले असणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित सलग्न संस्था, व्यवस्थापन, कर्मचारी यांचीही दुसरी लसीची मात्रा घेतल्यानंतर चौदा दिवस पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे पालन केले जात आहे, याबाबतचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, तसेच मागणीनुसार सक्षम अधिकार्याकडे त्याचा पुरावा उपलब्ध करून देणे देखील बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे, विवाह सोहळ्यात कोणत्याही परिस्थितीत निर्धारित व्यक्तीपेक्षा अधिक व्यक्ती बोलावणे शक्य नाही.
हेही वाचा - नाशिक : वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; घातपात झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप