नाशिक - जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवीन युरोपियन स्ट्रेन असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. हाच युरोपियन स्ट्रेन नाशिकमध्ये आढल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला गेल्या महिन्यात पाठवलेल्या आठ नमुन्यातील सहा नमुन्यांमध्ये युरोपियन स्ट्रेन सापडला आहे.
हेही वाचा - 'कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी सतर्क रहावे'
सॅम्पल पुण्याच्या एनआयव्हीत
नाशिक जिल्ह्यात मार्च 2021पासून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून मागील पंधरा दिवसात कोरोनाबधितांचा आकडा 12 हजारांच्या पुढे गेला आहे. तर मागील दोन दिवसांपासून 2 हजारांच्या घरात नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या डिसेंबर 2020नंतर 12 फेब्रुवारीपर्यंत कमी होत गेली होती. मात्र कोरोनाची रुग्णसंख्या अचानक वाढत असल्यापासून क्लस्टर सॅम्पल पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानुसार फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यातील जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले, त्यात सिन्नर आणि मालेगाव येथील रुग्णांमध्ये युरोपियन स्ट्रेन मिळून आल्याची माहिती प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी डॉ. दुधडिया यांनी दिली. भारतात युरोपियन स्ट्रेन हा दुबईमार्गे आल्याचा अंदाज आरोग्य यंत्रणेला आहे.
हेही वाचा - 'महाराष्ट्रात कोणी चाणक्य-बिणक्य चालणार नाही'
मृत्यू कमी पण प्रसार जास्त
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर युरोपियन स्ट्रेन मिळून आल्याचे स्पष्ट केले. मात्र या स्ट्रेनमुळे मृत्यू कमी असले तरी प्रसार वेगाने होत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवलेल्या 26 नमुन्यांपैकी 30 टक्के नमुन्यामध्ये युरोपियन स्ट्रेन आढळल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये 80 टक्के रुग्ण नाशिक शहरातील तर 18 टक्के रुग्ण ग्रामीण भागातील आहे.
जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती
- आतापर्यंत 1 लाख 40 हजार 887 कोरोनाबाधित
- आतापर्यंत 1 लाख 26 हजार 310 कोरोनामुक्त
- सध्या स्थितीत उपचार घेत असलेले रुग्ण - 12 हजार 380
- एकूण मृत्यू - 2 हजार 197
- जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण - 89.65