नाशिक - करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मजूर संघाने स्थानिक व्यवस्थापनाशी बोलणी करून आठ दिवस प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा प्रस्ताव दिल्लीला केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. यानंतर देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक असणाऱ्या प्रेसवर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस हे दोन महत्त्वाचे घटक देखील जवळपास बंद होते. दोन महिन्यानंतर सर्व शासकीय नियमांचा अवलंब करून ही दोन्ही प्रेस सुरू करण्यात आली. मात्र काही दिवस जात नाही तोच जी भीती होती तीच पुढे उभी ठाकली आहे.
दोन्ही प्रेसमध्ये सुमारे साडेतीन ते चार हजार कामगारांची संख्या आहे. जिल्ह्यातील विविध भागातून ते प्रेसमध्ये येतात. शिवाय काही कंत्राटी कामगार देखील आहेत. वातानुकूलित वातावरणात संपूर्ण काम असल्यानं या परिस्थितीमध्ये अनेक कामगारांमध्ये कोरोना सदृश्य लक्षणे दिसू लागली. मजूर संघाने प्रत्येक कामगारास 50 लाखांचा विमा कवच दिल्यानं काळजी नव्हती. परंतु हळूहळू प्रेसमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला, गेल्या दोन ते तीन महिन्यात दीडशेहून अधिक कामगारांना कोरोनाची बाधा झाली असून काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे. यामुळे कामगारांंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कौटुंबिक परिस्थितीवर परिणाम होऊ नये म्हणून भीती बाळगत येथील कामगार परिस्थितीला सामोरं जात आहेत. मात्र आता बाधित रुग्णांची संख्या अधिकच वाढू लागल्याने मजूर संघटनांनी व्यवस्थापनाशी चर्चा करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आठ दिवस प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यात आला. यावर आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.