नाशिक - काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विनायक पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पाटील यांना मुत्रपिंडाचा त्रास होता. डायलिसिस सुरू असताना त्यांना त्रास होऊ लागल्याने एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. तेथे उपचरादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७७ वर्षांचे होते.
नाशिकच्या राजकारणपलीकडे जाऊन त्यांचा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात मोठा वावर होता. विनायकदादा हे राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात. विनायक पाटील यांनी पुलोद मंत्रिमंडळामध्येही काम केले होते. विनायक पाटील यांचा शेती आणि वन चळवळ रुजविण्यात मोलाचा वाटा होता. काही वर्षापासून ते राजकारणापासून दूर असल्याने त्यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद यासह अनेक संस्थावर त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केले होते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी कृषी क्षेत्रातील त्यांची रुचि बघून विनायक पाटील यांना वनाधिपती ही उपाधी दिली होती. भाजपचे जेष्ठ नेते सुरेशबाबा पाटील यांचे ते बंधू होत. त्यांच्या पत्नीचे देखील काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात 2 कन्या आहे. विनायक दादा यांना पुस्तके वाचनाची आवड होती, तसेच त्यांनी काही पुस्तकांचे लेखन देखील केलं आहे.
एक अभ्यासू आणि सुसंस्कृत नेता अशी त्यांची ओळख होती. १९७८ साली पुलोदच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. १९८० मध्ये त्यांनी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र ते पराभूत झाले होते. नंतर ते विधानपरिषदेवर एकदा निवडून आले.वनविकास महामंडळाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्याच्या निधनाने नाशिक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे.
शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
निकटचे स्नेही विनायकदादा पाटील यांच्या निधनाने सुसंस्कृत, साहित्याची जाण असलेले, सामाजिक बांधिलकी जपणारे राजकीय व्यक्तिमत्व हरपले. चव्हाणसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात जी तरुण नेतृत्वाची फळी निर्माण झाली त्या पिढीतल्या माझ्या इतर सहकाऱ्यांसोबत विनायकदादा पाटीलही होते, अशा आठवणी शरद पवारांनी व्यक्त केल्या.
शेतकऱ्यांबद्दल तळमळ व शेतीबद्दलची ज्ञानलालसा हा आमच्यातला दुवा. वनशेतीचं धोरण ठरवण्यामध्ये विनायकदादांनी पुढाकार घेतला होता. वाचनाचा व्यासंग मोठा व लेखक म्हणूनही त्यांचा लौकिक. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य असल्याचे सांगत पवारांनी विनायकदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली!