नाशिक - जुने नाशिकातील तांबट गल्लीमध्ये एका जुन्या वाड्याला आग लागली. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही अशी माहिती नाशिक मनपाच्या अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सिडको भागातील एका गाडीच्या गोडाऊनला आग लागल्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा जुने नाशिक भागातील तांबट गल्लीमध्ये एका जुन्या वाड्याला दुपारी बारा वाजेच्या सुमारास आग लागली आहे. प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं आढळून आले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जुने नाशिक भागातील रस्ते अरुंद असल्याने या ठिकाणी दलाच्या छोट्या गाडीला घटनास्थळी तातडीने दाखल करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. दरम्यान, काही तासांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.
तिसऱ्यांदा वाड्याला लागली आग
आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी मात्र वाड्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या वाड्यामध्ये कोणीही वास्तव्यास नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, यातील धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही वर्षातील याच वाड्याला आग लागण्याची ही तिसरी घटना असल्याचं अग्निशमन विभागाच्यावतीने संगण्यात आले आहे.