नाशिक - जिल्ह्यातील 'पिंपळगाव-बसवंत कृषी ऊत्पन्न बाजार समिती' कांदा व्यापाऱ्यांसाठी देशातील प्रसिद्ध बाजार समिती आहे. कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळावा या आशेने अनेक शेतकरी या ठिकाणी आपला माल घेऊन येतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी तृतीयपंथीयांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.
कांदा लिलावात पिंपळगाव येथे जास्त भाव भेटत असतो. यामुळे धुळे, नंदुरबार, साक्री, कळवण, सटाणा, पिंपळनेर या भागातुन मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा विक्रीस आणतात. परंतु येथील स्थानिक तृतीयपंथीयांकडून शेतकऱ्यांच्या असाहाय्यतेचा गैर फायदा घेतला जातो. प्रत्येक शेतकऱ्याच्या वाहनातुन बळजबरीने आडवे टोपले लावून अथवा गोणी लावून कांदा घेतला जातो. विरोध करणाऱया शेतकऱ्याला शिव्या दिल्या जातात अथवा प्रसंगी मारहानदेखील केली जाते.
शेतकऱ्यांच्या या लुटीचे आर्थिक वास्तव खुपच धक्कादायक आहे. पिंपळगाव मार्केटमध्ये दररोज साधारणपणे ३०० पिकअप व ३०० ट्रॅक्टर येत असतात. ३०० पिकअप व ३०० टॅक्टर यांमधून प्रत्येकी ५ किलो कांदा या प्रमाणे एकून ३००० किलो कांदा दररोज जमा केला जातो. १० रू किलो बाजारभावा प्रमाणे रोज 'तीस हजार' रूपयांचा कांदा तृतियपंथीयांकडून विकला जातो. महिन्याचे २५ दिवस मार्केट सुरू असते, म्हणजे दररोज तीस हजार रूपये या प्रमाणे महिना 'सात लाख पन्नास हजार' रूपयांचा कांदा तृतीयपंथी जमा करतात. ही सरळ सरळ शेतकऱ्यांची लूट आहे.
या वास्तवानंतर अनेक प्रश्न उपस्थीत केले जात आहेत. अशी लूटमार करणाऱ्या तृतियपंथीयांना मार्केट कमिटीत प्रवेश कसा काय दिला जातो? त्याच्या मागे ४-५ युवक कांदे जमा करतात, प्रत्येक रांगेत ६-७ गोण्या भरून बाजुलाच ऊभ्या असणऱ्या मालवाहतूक वाहनात भरतात. लाखो रूपयांच्या लुटीवर संचालक मंडळ, चेअरमन, व्यापारी व प्रशासन मूग गिळून गप्प का? असा प्रश्न गरीब शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.
'शरदचंद्र पवार मार्केट'च्या संचालक मंडळ, चेअरमन, व्यापारी, प्रशासन आणि शेतकरी नेते यांनी याकडे लक्ष घालून कांदा उत्पादक शेताकाऱ्यांची ही रोजची होणारी लूट थांबवावी व मार्केटमधील त्या तृतियपंथीयांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
अशाच एका तृतीयपंथीयाचा विडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.