नाशिक - नाशिकमध्ये ऑक्सिजन बेड्सअभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याने रामशेज येथे होणारा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा रद्द करून गरजू रुग्णांना ऑक्सिजन किट वाटप केले आहे. यामुळे छत्रपती युवासेना या कोरोना काळात कोरोनाबधितांची संजीवनी ठरत आहे.
ऑक्सिजन अभावी अस्ताव्यस्त झालेल्या रुग्णांसाठी छत्रपती सेना ठरली संजीवनी
राज्यासह नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यामुळे सर्व सामाजिक संस्था संघटनांनी पुढाकार घेऊन या बिकट परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आवाहन सातत्यानं राज्य शासनाकडून करण्यात येत आहे. यातच नाशिक जिल्ह्यातही आता ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत असल्याने अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपले प्राण गमवावे लागत आहेत. यामुळे छत्रपती युवा सेनेच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दरवर्षी नाशिकच्या रामशेज किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा रद्द करून सोहळ्यासाठी जमलेल्या निधीमधून छत्रपती युवा सेनेच्या वतीने नाशिकमधील अस्ताव्यस्त अवस्थेत असलेल्या जवळपास पंचवीस रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन किट उपलब्ध करून देण्यात आले आहे..
सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने ऑक्सिजन तुटवडा भरून निघतो
कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना अगदी गरजेच्यावेळी छत्रपती युवा सेनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून मोठ्याप्रमाणावर कौतुक केले जात आहे. तर जास्तीत जास्त सामाजिक संघटना आणि संस्थांनी पुढाकार घेऊन या बिकट परिस्थितीत बाधितांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्याला सध्या 120 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. आणि शासनाकडून 85 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांनी घेतलेल्या पुढाकारामुळे काही प्रमाणात का होईना ऑक्सिजन तुटवडा भरून निघत आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढणार हे मात्र नक्कीच.
हेही वाचा - कोल्हापूर : महालक्ष्मी एक्सप्रेस १३ दिवस रद्द; कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा बंद